ठाणे- ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची बदली जळगाव जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली असून, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
ठाणे जिल्हा परिषदेने रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आता या वाटचालीला अधिक वेग देत नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाचा ध्यास कायम ठेवू,असे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषदेचा अतिरिक्त कार्यभार स्विकारताना मनोज रानडे यांनी केले.
रोहन घुगे यांनी १९ जून २०२४ मध्ये जिल्हा परिषद ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि प्रशासन या क्षेत्रात ठाणे जिल्हा परिषदेत उल्लेखनीय बदल घडवून आणले. त्यांनी शासनाच्या दिशा उपक्रम, ई-ऑफिस प्रणाली, ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी, ई-कामवाटप आणि एआय आधारित प्रशासन या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जिल्हा प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर दिला.
तसेच मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने उत्तम कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, ही त्यांची मोठी कामगिरी ठरली. त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणून जळगावच्या जिल्हाधिकारी पदी रोहन घुगे यांना बढती देण्यात आली. घुगे यांनी जळगाव जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आता, ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार पालघर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांना सोपविण्यात आला आहे.