सायकलीच्या चाकांवरून ग्रंथसेवा

ग्रंथालयाचा उद्देश म्हणजे वाचकांना त्यांच्या आवडीनुसार ग्रंथसेवा पुरवणे, वाचन संस्कृती टिकवणे असतो.

कल्याणमधील एका वाचनप्रेमी गृहस्थाने वाचकांना घरपोच पुस्तके देण्याचा उपक्रम राबविला असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळतो आहे.

कोणत्याही ग्रंथालयाचा मुख्य उद्देश म्हणजे वाचकांना त्यांच्या आवडीनुसार ग्रंथसेवा पुरवणे, वाचन संस्कृती टिकवणे हाच असतो. या उद्देशातूनच एखाद्या परिसरात ग्रंथालयाची वास्तू उभी राहते. वेगवेगळ्या साहित्याचा भरणा त्या ग्रंथालयात होतो आणि वाचनाची आवड असणाऱ्या संबंधित परिसरातील नागरिकांना ग्रंथालयाच्या माध्यमातून साहित्याचा आनंद लुटता येतो. या ग्रंथालयात नीटनेटक्या पद्धतीने साहित्याच्या प्रकारानुसार पुस्तकांची मांडणी केली जाते. वाचक मागणी करतील त्यानुसार ग्रंथपाल त्यांना पुस्तकांची सेवा पुरवतो. मात्र कल्याणमधील एका वाचनप्रेमी गृहस्थाने वाचकांना घरपोच पुस्तके देण्याचा उपक्रम राबविला असून त्याला उत्तम प्रतिसादही मिळतो आहे.
कल्याण शहरात राहणारे दत्तात्रय कुलकर्णी हे गृहस्थ गेली ४४ वर्षे आपल्या विकास वाचनालयाच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण शहरातील नागरिकांना घरपोच ग्रंथसेवा पुरवत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर चाकोरीबद्ध नोकरी करण्याची दत्तात्रय कुलकर्णी यांची इच्छा नव्हती. स्वत:चा व्यवसाय असावा असे स्वप्न त्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच मनाशी बाळगले होते. फक्त स्वप्न न पाहता शिक्षण घेत असतानाच आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय त्यांनी घेतला. त्यांच्या वर्गमित्राची आई त्यावेळी फिरत्या वाचनालयाचे काम करत होती. कुलकर्णीना मित्राच्या आईकडून कामाची प्रेरणा मिळाली. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल हातात नव्हते. दत्तात्रय कुलकर्णी यांना आईने भाजीसाठी दिलेल्या पैशातून उरलेले काही पैसे साठवण्याची सवय होती. याच आपल्या बचतीतून मासिकांची खरेदी करत त्यांनी १ मे १९७२ रोजी मासिकांच्या घरपोच सेवेला प्रारंभ केला. सुरुवातीला तीनशे पंधरा रुपयांच्या बचतीतून तीस रुपयांच्या मासिकांची खरेदी कुलकर्णी यांनी केली आणि आपल्या १३ वर्गमित्र सभासदांच्या माध्यमातून या व्यवसायाला सुरुवात केली. दीड रुपये मासिकांची किंमत, मासिक शुल्क अडीच रुपये अशी सुरुवातीची वर्गणी ठरवण्यात आली. कुलकर्णी यांच्या व्यवसायाला सुरुवातीला घरून विरोध होता. मात्र त्यांची इच्छाशक्ती प्रबळ होती. आता कल्याणमधील लालचौकी परिसरात आपले छोटेसे पण मासिके आणि पुस्तकांनी सुसज्ज असे दुकान मांडले आहे. दत्तात्रय कुलकर्णी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत कल्याण परिसरात आपल्या सायकलीवरून घरपोच सेवा पुरवतात. पुढील वेळात दुपारी १२.३० पर्यंत आपल्या दुकानाबाहेर पुस्तके मांडतात आणि वाचकांना दररोज नवनवीन पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून देतात.
दररोज सकाळी घरोघरी ग्रंथसेवा पुरवण्यासाठी इमारतींचे मजले चढायचे आणि पुन्हा आपल्या दुकानात येऊन नव्या वाचकांना पुस्तकांची ओळख करून द्यायची हे कुलकर्णी यांचे नित्याचे काम. व्यवसाय करायचा म्हणजे स्वत:साठी गडगंज पैसा कमवायचा अशी साधारण प्रत्येकाची धारणा असते. मात्र केवळ गरजेपुरता व्यवसाय करायचा आणि उर्वरित सामाजिक कार्य करताना वाचन चळवळ उभी करण्याचे मोलाचे कार्य दत्तात्रय कुलकर्णी गेली अनेक वर्षे करत आहेत. कल्याणमधील वेगवेगळ्या शाळांमध्ये पुस्तकांचे वितरण विशेष सवलतीमध्ये कुलकर्णी स्वत: करतात. मुंबई, ठाणे शहरातील वेगवेगळ्या प्रकाशकांकडे जाऊन दत्तात्रय कुलकर्णी स्वत: पुस्तकांची खरेदी करतात. वाचकांच्या मागणीनुसार पुस्तकांची खरेदी होत असते. विकास वाचनालयात मराठी पुस्तकांची मागणी जास्त आहे. वाचकांच्या निरनिराळ्या आवडीनुसार जवळपास शंभर प्रकारच्या मासिकांची खरेदी कुलकर्णी यांना करावी लागते. बऱ्याचदा ज्या पुस्तकांची मागणी जास्त आहे, अशा पुस्तकांचे बुकिंग खूप काळ आधीच त्यांच्याकडे होत असते.

कुटुंब रंगलंय ग्रंथसेवेत
वाचकांना मागणीनुसार पुस्तके, मासिके उपलब्ध करून देणे हे ग्रंथालयातील ग्रंथपालाचे काम. विकास वाचनालयाचे संस्थापक दत्तात्रय कुलकर्णी आणि ग्रंथपालही तेच. त्यांच्या दिवंगत पत्नीही ग्रंथपाल होत्या.मुलगी रूपाली ढवळे आणि कनक कुलकर्णीसुद्धा ग्रंथपाल आहेत. महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी दत्तात्रय कुलकर्णी यांच्या या कार्याचा गौरव केला आहे. भाऊ, पत्नी आणि मुली यांच्या सहकार्याने माझ्या आवडीचा व्यवसाय करता आला, तो सचोटीने आणि तत्त्वे सांभाळून केला असे दत्तात्रय कुलकर्णी आवर्जून सांगतात.

कै. साबीर शेख स्मृती समाज मंदिर,
पत्ता- विकास वाचनालय, पारनाका, कल्याण (पश्चिम)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mans distribute book on cycle to save reading culture