ठाणे : भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचा भाऊ तेजस तांगडी यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात जर २०२१ मधील गोळीबाराच्या घटनेनंतर ठोस कारवाई झाली असती, तर आजचा हा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता, अशी भावना माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज व्यक्त केली.
सोमवारी रात्री काही समाजकंटकांनी तांगडी बंधूंची निर्दयपणे हत्या केली. या घटनेमुळे भिवंडीत खळबळ उडाली आहे. त्या वेळी दिल्ली दौऱ्यावर असलेले पाटील मंगळवारी भिवंडीत परत आले आणि तांगडी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ मध्ये दिवंगत प्रफुल्ल तांगडी यांच्यावर गोळीबार झाला होता. मात्र, त्यानंतर दोषींवर ठोस कारवाई झाली नाही. जर ती वेळेवर झाली असती, तर आजचा हा दुर्दैवी प्रकार टाळता आला असता.” या हत्याकांडाबाबत त्यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिस उपमहानिरीक्षक आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांशीही चर्चा करून आरोपींना लवकर अटक करण्याची मागणी केली.
“गुन्हेगार कितीही प्रभावशाली असले तरी त्यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई झाली पाहिजे. सर्व आरोपी लवकरच गजाआड होतील, असा मला विश्वास आहे,” असे पाटील म्हणाले. त्यांनी भिवंडी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचे मूळ शोधून ती आटोक्यात आणण्याची गरजही पोलिसांना अधोरेखित केली.