भाईंदर : मिरा भाईंदरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेला पोलिसांनी अखेर सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मनसेच्या आंदोलन आणि सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये येणार आहेत. मिरा रोड येथे पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी त्यांची उपस्थिती असून, याच ठिकाणी त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच परिसरातील बालाजी चौकात मराठी भाषेवरून मनसे कार्यकर्त्याने एका दुकानदाराला मारहाण केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा आणि सभा घेण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटल्याने अवघ्या दहा दिवसांतच राज ठाकरे मिरा भाईंदरमध्ये येत आहेत.
त्यामुळे त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही, याबाबत मराठी आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान, मनसे शहरप्रमुख संदीप राणे यांनी मिरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ कडे सभेसाठी परवानगीची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनी अखेर राज ठाकरे यांच्या सभेस सशर्त परवानगी दिली आहे.
या अटींमध्ये वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. खुर्च्या, मंडप आणि इतर साहित्याच्या अनुषंगानेही नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सभेचे चित्रीकरण करण्यासाठी अटी-शर्तींच्या अधीन राहून ड्रोन कॅमेरे वापरण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या अग्निशमन व ध्वनी नियंत्रण परवानग्यांना पोलिसांनी नाहरकत दाखला दिला आहे. महत्वाचे म्हणजे, दिलेल्या अटी आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास परवानगी तत्काळ रद्द करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.