कल्याण : वाहतूक कोंडीमुळे रस्ते मार्गाने संध्याकाळच्या वेळेत कल्याण, डोंबिवली दिशेने पोहचणे प्रवाशांसमोर मोठे दिव्य असते. तासनतास वाहतुकीत अडकावे लागते. हा अनुभव गाठीशी असल्याने कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे दोन दिवसापूर्वी विधीमंडळ अधिवेशन संपल्यावर रस्ते मार्गाने न येता सीएसएमटीहून लोकलने डोंबिवलीत आले. सामान्य प्रवाशांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आमदार मोरे यांनी रेल्वेने प्रवास केला असल्याचे आमदार मोरे समर्थकांनी समाज माध्यमांवर छायाचित्रांसह आमदार मोरे यांची छायाचित्रे सामाईक केली. त्यामुळे नेहमीच धक्केबुक्के खात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आमदार मोरे यांना टीकेचे लक्ष्य केले.

आमदारांना लक्ष्य करणाऱ्यांमध्ये महिला, पुरूष प्रवाशांचा समावेश होता. संध्याकाळच्या वेळेत मुंबई, नवी मुंबईतून कल्याण, डोंबिवली दिशेने रस्ते मार्गाने येणे म्हणजे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास असतो. मुंब्रा, पनवेल मार्ग, कल्याण शिळमार्ग, मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी बाह्य वळण रस्ता- कोन ते दुर्गाडी रस्ता वाहनांनी गजबजून गेलेला असतो. मुंबई ते डोंबिवली, कल्याण या रस्ते मार्गाच्या दीड ते दोन तासाच्या अंतरासाठी अनेक वेळा तीन ते चार तास लागतात.

मुंबईत विधिमंडळ अधिवेशन सुरू होते. आमदार राजेश मोरे आपल्या विशेष गाडीने सकाळीच मुंबईत अधिवेशनासाठी जात होते. परंतु परताना त्यांना दररोज रस्ते मार्गातील वाहतुकीचा सामना करावा लागत होता. अधिवेशन संपण्याच्या काळात आमदार राजेश मोरे यांनी वाहन कोंडीला कंटाळून रेल्वे मार्गाने झटपट घरी जाऊन असा विचार करून सीएसएमटी येथून डोंबिवलीचा लोकलने प्रवास केला. सामान्य डब्यातून आमदार मोरे, समर्थक प्रवास करत होते.
आमदार मोरे समर्थकांनी या प्रवासाचे मार्केटिंग करण्याचा विचार करून त्यांची रेल्वे प्रवासातील छायाचित्रे, प्रवाशांशी हितगुज करतानाची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केली. आमदार मोरे यांची समाज माध्यमांवरील छायाचित्रे आणि मजकूर वाचून दररोज कल्याण, डोंबिवली भागातून सकाळच्या वेळेत लोकलने धक्कबुक्के खात जाणाऱ्या प्रवाशांचा तिळपापड झाला.

त्यांनी आमदार मोरे यांना समाज माध्यमातून प्रत्युत्तर देताना, रात्रीच्या वेळेत गर्दी नसलेल्या डब्यातून प्रवास करण्यापेक्षा सकाळच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकातून आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यानच्या लोकल पकडून दाखवा. त्यातून प्रवास करून दाखवा म्हणजे सामान्य प्रवासी कसा प्रवास करतो ते कळेल. महिला प्रवाशांची दुखे आपणास समजतील. केवळ देखाव्यापुरता प्रवास करून रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटणार नाहीत. त्यासाठी दररोज डोंबिवली ते मुंबई सकाळच्या वेळेत प्रवास करावा म्हणजे प्रवासी कशा मरणयातना भोगत आहेत ते कळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांसाठी स्वतंत्र वातानुकूलित लोकल सकाळच्या वेळेत वाढवा. दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करा, या प्रवाशांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून प्रवाशांना तुम्ही सामान्य प्रवासी म्हणताच कसे. बहुतांशी प्रवासी हे सरकारी, निमसरकारी कार्यालयातील उच्चपदस्थ आहेत. प्रवासी एकावेळी समाज माध्यमांत आमदार मोरे यांच्या मजकुरावर तुटून पडल्याने कोणाही आमदार समर्थकाने यावेळी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला नाही.