ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल ते कोपरी आनंदनगर भागात उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहे. या कामाचा महत्त्वाचा टप्पा महामार्गावरील माजिवडा ते आनंदनगर भागात सुरु झाला असून ठिकठिकाणी खोदकामे झाली आहेत. माजिवडा ते आनंदनगर हा मार्ग वाहतुकीच्या तुलनेत अरुंद आहे. आता उन्नत मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरु झाल्याने महामार्गाला कोंडीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी कोपरी आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम केले जाणार आहे. घोडबंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण येथील वाहन चालकांना मुंबईच्या दिशेने वाहतुक करण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करतात. गेल्याकाही वर्षांपासून या मार्गावरील तीन हात नाका ते माजिवडा या भागात मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवर मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. येथील तीन हात नाका, नितीन कंपनी चौक, कॅडबरी जंक्शन हे चौक ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांना जोडतात. परंतु मेट्रोची कामे, रस्ते उंच सखल झाल्याने दररोज वाहतुकीचा जाच वाहन चालकांना सहन करावा लागतो.

माजिवडा चौकात अवजड वाहनांचा भार वाढू लागल्यानंतर चौकातील कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांना देखील माजिवडा उड्डाणपूलावरून कॅडबरी जंक्शन मार्गे वळवून वाहनांना घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करावी लागते. मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु असतानाच उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम केले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच नव्याने बांधण्यात आलेल्या आनंदनगर कोपरी येथील रेल्वे उड्डाणपूलावर, नितीन कंपनी परिसरात खोदकामे करण्यात सुरु होती. आता कॅडबरी जंक्शन जवळही खोदकामे सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी महामार्गावरील उड्डाणपूलाजवळ कामे केली जात आहेत. सध्या या ठिकाणी मातीचे परिक्षण केले जात असून लवकरच विविध यंत्रांद्वारे कामे सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोंडीत वाढ होण्याची भिती निर्माण झाली आहे.

सध्या पूर्व द्रुतगती महामार्गावर विविध भागातून नोकरदार मुंबईत वाहतुक करतात. जड-अवजड वाहनांचा भारही यामध्ये असतो. अनेकदा सकाळी वाहनांचा भार वाढल्यास किंवा एखादा किरकोळ अपघात झाल्यास आनंदनगर ते माजिवडा पर्यंत वाहतुक कोंडीचा सामना प्रवाशांना सहन करावा लागतो. आता निर्माण कामे सुरु झाल्यास कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चौकट मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या निर्माणाचे काम पूर्ण झाले असून नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासह विविध जिल्ह्यातून या महामार्गाने अनेक वाहन चालक मुंबई गाठतात. हा महामार्ग भिवंडी येथील आमणे भागात पूर्ण होतो. तेथून येथील वाहन चालकांना मुंबई नाशिक महामार्गाने पूर्व द्रुतगती महामार्गाने मुंबई गाठता येते. त्यामुळे ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढणार असून या उन्नत मार्गिकेमुळे प्रवाशांना दिलासा मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

पूर्व द्रुतगती महामार्गावर दररोज वाहतुक कोंडी होते. मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी खोदकामे सुरु झाली आहे. मेट्रोची कामे पूर्ण सुरु असतानाच आता या नव्या प्रकल्पाची कामे सुरु झाल्याने आणखी किती दिवस कोंडीचा त्रास सहन करावा लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. – सागर ढवळे, प्रवासी.