ठाणे – घोडबंदर येथील गायमुख घाट रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून याठिकाणी गेल्या सहा महिन्यात १५ ते १६ जणांना जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक बाब मनसे नेते अविनाश जाधव यांनी समोर आणली आहे. गेले नऊ वर्षांपासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे. येत्या दिवसात खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू अशा शब्दात अविनाश जाधव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
घोडबंदर गायमुख घाट रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहे. काही दिवसांपूर्वी यामार्गावर एका २२ वर्षीय तरुणीला अपघातात जीव गमवावा लागला होता. गेले नऊ वर्षांपासून या रस्त्याची अशीच परिस्थिती आहे. यासंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांना जाब विचारला. खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांना खड्ड्यात गाडू असा सुचक इशारा जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिला.
ठाणे शहराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लाभलेले असतानाही ठाणेकरांची या त्रासातून सुटका होत नाही, हे दुर्भाग्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत, अशी टीका देखील जाधव यांनी यावेळी केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गेले दहा – पंधरा वर्षे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना येवढ्या वर्षात गायमुख घाटातील रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाही. राजकीय नेते केवळ आश्वासन देतात पण, त्याचे पुढे काही होत नसल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला.
मी गेल्या नऊ वर्षांपासून मनसेचा पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे कामानिमित्त वसई, विरार जात असतो. वसई, विरार किंवा मिरा-भाईंदरहून रात्रीच्या वेळी ठाण्यात परतताना घोडबंदर मर्गावरून ठाणे शहरात यायला दोन ते अडीच तास लागतात.
मोठमोठ्या कंटेनरची वाहतूक त्यात खड्डे यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ही आजची गोष्ट नाही तर, गेले अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती सुरु असल्याची टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. ही परिस्थिती राजकीय नेत्यांना दिसत नसेल तर, ठाणेकरांच दुर्भाग्य आहे. ठाणेकर आता कुठे कोपरी पुलाच्या जाचातून सुटलो आहे. परंतू, घोडबंदरची परिस्थिती पाहता इथले नेते केवळ आकडे फेकत आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कामे झालेली नाहीत असेच दिसत आहे. गेले अडीच वर्षांपासून तुमचे मुख्यमंत्री आणि सरकार असतानाही ठाणे वाहतूक कोंडीच्या जाचातून सुटणार नसेल तर, हे ठाण्याचे दुर्भाग्य आहे, असे देखील अविनाश जाधव म्हणाले.