ठाणे – ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना आराखडा प्रशासनाने काही दिवसांपुर्वी जाहिर केला असून या आराखड्यामुळे येत्या काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसरत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. असे असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी ठाण्यातील शहराध्यक्ष ते उपशाखाध्यक्षपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याद्वारे निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा केला. या बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाचा कानमंत्र दिला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे. या आराखड्यांमुळे येत्या काही महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशाचप्रकारे ठाणे महापालिकेनेही प्रारुप प्रभाग रचना आराखडा तयार केला आहे. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. यानुसार गेल्या म्हणजेच २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच यंदा ठाण्यात चार सदस्यांचे ३२ तर, तीन सदस्यांचा एक असे एकूण ३३ प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे. यामधून १३१ नगरसेवक निवडुण येणार आहेत.

निवडणुक तयारीचा श्रीगणेशा

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना आराखडा प्रशासनाने काही दिवसांपुर्वी जाहिर केल्याने येत्या काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसरत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. असे असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गणेशोत्वाच्या मुहूर्तावर शनिवारी ठाण्यातील शहराध्यक्ष ते उपशाखाध्यक्षपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आदेश दिले. या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी ठाण्यातील निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा केला.

पदाधिकाऱ्यांना दिला हा कानमंत्र

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कसे काम केले पाहिजे, मतदार याद्यांवर कसे बारीक लक्ष दिले पाहिजे तसेत सोशल मिडीयाचा वापर पक्षाची ध्येय धोरण पोहचविण्यासाठी कसा केला पाहिजे, याविषयी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. मतचोरीबाबत आता बोलले जात आहे. परंतु आपला पक्ष आधीपासूनच हे बोलत आहे. २०१४ नंतर आपल्या निवडणुकीत अपयश आले. कारण, मतदार यादीत घोटाळे करून ते निवडणुका जिंकत आहेत. त्यामुळे मतदार याद्यांवर बारिक लक्ष दिले तर आपल्या पक्षाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास राज ठकारे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केला.

अभ्यासून बीएलएची नेमणुका करा

मतदार याद्यांमध्ये दुबार, बोगस मतदारांची नावे नाहीत ना, तसेच आपल्या परिचित व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत का, याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी आपल्या पक्षाकडून नेमण्यात येणारे बीएलए ( बूथ लेव्हल एजंट) यांची नेमणुक करताना कशी करायला हवी, याबाबत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. हुशार आणि अभ्यासू व्यक्तींची बीएलए म्हणून नेमणुक करा आणि त्यांच्यामार्फत याद्यांवर बारकाईने लक्ष द्या, अशी सुचना राज ठाकरे यांनी केली.