ठाणे : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी नुकतीच माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली आहे. ठाणे शहर हे भ्रष्टाचाराची राजधानी झाली असून त्यांनी महापालिकेच्या कारभारावर तसेच सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. जाधव यांनी राज्यातील अनेक बडे नेते जेलमध्ये दिसतील असा दावाही केला आहे. अविनाश जाधव नेमके काय म्हणाले आहेत.जाणून घेऊन…

ठाणे शहरातील विविध नागरी समस्यांच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि महाविकास आघाडीने मोर्चा काढला होता. ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनी देखील मोर्चात सहभाग घेतला होता. ठाण्यात शिंदे यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळेल याविषयी तेथील राजकीय वर्तूळात उत्सूकता होती. या मोर्चानंतर आता महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येऊन विविध आंदोलन करणार असल्याचा दावाही पक्षाचे नेते करत आहेत. अविनाश जाधव हे मनसेतील पहिल्या फळीचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गंभीर आरोप नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेत केला आहे. त्यांनी ठाण्याचा विकास झाला नसल्याचा दावाही केला आहे.

मुख्यमंत्री असतानाही ठाण्याचा विकास नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात वास्तव्यास आहेत. याविषयी प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव म्हणाले. ठाणे शहराला तीन वर्ष मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री पद लाभले. परंतु ठाण्याचा विकासच झाला नाही असा आरोप त्यांनी केला. ठाणे भ्रष्टाचाराची राजधानी – कामांसाठी करोडो रुपये आले. त्याच्या निविदा निघाल्या. त्यातून स्वत:चा हिस्सा काढण्यात आला. परंतु त्यानंतर तो कंत्राटदार काय काम करतो, करतो की नाही, हे कोणीही पाहत नाही आणि बोलतही नाही. त्यामुळे कंत्राटदार, नेत्यांचे फावले आहे.

त्यामुळे ठाण्याला आता भ्रष्टाचाराची राजधानी नाव पडले आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केला. चौकशी लागल्यास महाराष्ट्रातील बडे नेते जेलमध्ये कोणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी ठाणे महापालिका आणि वसई-विरार-मिरा भाईंदर महापालिकेची प्रामाणिक चौकशी लावावी. त्यानंतर महाराष्ट्रातील बडे नेते जेलमध्ये दिसतील असा दावा करत त्यांनी गंभीर आरोप केला.