ठाणे: कल्याण-शिळफाटा रस्त्यावर वर्षानुवर्षे सुरू असलेली वाहतूककोंडी रक्षाबंधनाच्या दिवशी पुन्हा एकदा नागरिकांना त्रासदायक ठरली. सलग तीन दिवस या रस्त्यावर वाहनचालक तासनतास अडकत आहे. या कोंडीवरून मनसे नेते राजू पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे थेट सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ‘बालकमंत्री’ अशी उपाधी देत त्यांनी चिमटे काढले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भ्रष्टनाथ’ म्हणत भ्रष्टाचाराचा थेट आरोप केला.
राजू पाटील यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “ना जनाची, ना मनाची! रस्ते रुंदीकरण, पुलांचे बांधकाम, दुरुस्त्या – या सगळ्यात मलिदा खाऊन झाला, आता पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली नवीन मलिदा खाण्याची वेळ आली आहे. पण ट्रॅफिकचा प्रश्न सोडवणं मात्र या ‘बालकमंत्र्यांच्या’ आणि ‘भ्रष्टनाथांच्या’ आवाक्याबाहेर आहे.”
पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढत, नागरिकांच्या जीव, वेळ आणि जीवनाचा काहीही विचार केला जात नसल्याचा आरोप केला. “हे मंत्री चॉपर, हवाईमार्ग वापरतात. रस्त्यावर यावे लागले तर नागरिकांना थांबवून त्यांच्या गाड्यांना मोकळा रस्ता करून दिला जातो. पण सामान्य कल्याण-डोंबिवलीकरांचं अर्ध आयुष्य या ट्रॅफिकच्या गर्दीतच संपतं,” असे त्यांनी म्हटले.
पुढे राजकीय भ्रष्टाचारावरही पाटील यांनी निशाणा साधला. “हे सत्ताधारी टक्केवारीतून ओरबाडलेला पैसा वाटून पक्ष फोडतात, गद्दार गँग वाढवतात. खरं तर आश्चर्य त्या लोकांवर आहे जे रोज या वाहतूककोंडीने त्रस्त होऊनही धर्म आणि भावनेच्या आहारी जाऊन या बकासुरांना मतदान करतात,” असा रोखठोक हल्ला पाटील यांनी केला.
कल्याण-शिळफाटा मार्ग हा मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पनवेलकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने या मार्गावरील सततची कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. दररोज हजारो वाहने काटई कडून शिळफाटा मार्गे मुंब्रा किंवा महापे वरुन ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईकडे जातात. काटई, पलावा आणि कल्याण फाटा येथे मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. या सर्व ठिकाणी महत्त्वाचे चौक आहेत. परिणामी येथे वाहने खोळंबल्याने कोंडी वाढते. मात्र, वर्षानुवर्षांच्या मागण्यांनंतरही ठोस उपाययोजना न झाल्याने नाराजी वाढत चालली आहे. राजू पाटील यांच्या या पोस्टनंतर सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा चर्चेचे आणि टीकेचे वारे वाहू लागले आहेत.