ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक नाले कचऱ्याने भरलेले असल्याचा दावा करत ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. नालेसफाई योग्यपद्धतीने झाली नाही तर, तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासन पावसाळ्यापुर्वी प्रभाग समितीनिहाय नालेसफाईची कामे करते. यासाठी संबंधित प्रभाग अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देखरेख केली जाते. असे असले तरी यंदा इंदिरा नगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, माजीवाडा, घोडबंदर रोड यांसारख्या भागातील नाले अजूनही कचऱ्याने भरलेले आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. के विला परिसरात पहिल्याच पावसात मुख्य नाला तुंबल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला. अशाच प्रकारची परिस्थिती शहरातील इतर भागांमध्ये उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नालेसफाई करताना “डिसिल्टिंग” पद्धतीचा वापर करून संपूर्ण नाल्याची सफाई करणे बंधनकारक आहे. तसेच सफाईनंतरचा गाळ आणि कचरा तात्काळ कचराभुमीवर हलवणे आवश्यक असताना, अनेक ठिकाणी तो नाल्याच्या कडेला किंवा पुन्हा नाल्याच्या आतच ढकलून ठेवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका प्रशासन दरवर्षी नालेसफाईसाठी नवीन योजना आणि तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करत असले, तरी ठेकेदारांकडून ही कामे केवळ कागदावर दाखवली जात असल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.
ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नालेसफाई अत्यंत महत्त्वाची असून महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्याकडून प्रामाणिक आणि पारदर्शक काम होणे अपेक्षित आहे. अन्यथा, पावसाळ्यात शहर पुन्हा एकदा जलमय होण्याचा धोका आहे, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.
योग्यप्रकारेच नालेसफाईची कामे
ठाणे महापालिका क्षेत्रातील १८१ किमीचे नाले, रेल्वेची गटारे, छोटी गटारे आणि नाल्यांची साफसफाई टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. नालेसफाईची कामे पुर्ण करण्यासाठी ठेकेदारांना ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली असून ही कामे योग्यप्रकारे होत आहेत की नाही, यावर पालिका लक्ष ठेवत आहे. सद्यस्थितीत नालेसफाईची कामे योग्यप्रकारेच सुरू आहेत. तसेच नालेसफाईबाबत कुणाची तक्रार असेल तर त्यांनी आमच्या विभागाकडे तक्रार करावी. जेणेकरून त्याचे निरसन करता येईल. – मनीष जोशी, उपायुक्त, ठाणे महापालिका