ठाणे : विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव नसल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी भूमिका घेतली आहे. दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला नसल्याने उद्घाटनाला जाणार नसल्याचे खासदार बाळ्या मामा यांनी सांगितले. ज्या दिवशी दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जाईल. त्यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार देखील करु असेही ते म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि सिडकोच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. विमानतळाचे विविध अंगांनी चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर त्याची पहिली दृश्ये टिपण्यासाठी नागरिक सज्ज आहेत. देशाचे राष्ट्रीय फूल कमळावर आधारित स्टील आणि काचेपासून तयार केलेले तरंगते कमळ हे या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचे आकर्षण असणार आहे. या विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलला चार महत्त्वाचे प्रवेशद्वार असणार आहेत. तसेच तीन महत्त्वाची केंद्र येथे असतील.

दुसरीकडे विमानतळाच्या नामकरणावरुन देखील वाद आहे. विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी भूमिपूत्रांची होती. परंतु उद्घाटनाच्या दिवशी देखील विमानतळाचे नामकरण झाले नसल्याने भूमिपूत्रांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बाळ्या मामा यांनी दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जावे यासाठी आंदोलनाचा देखील इशारा दिला होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले होते.

काय म्हणाले बाळ्या मामा

उद्घाटनाच्या सुरुवातीपासून आमच्या सर्वांची मागणी होती की, राष्ट्रीय नेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे. मी देखील त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. दि.बा. पाटील यांचे नाव देणार नाही तोपर्यंत विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा देखील दिला होता. परंतु ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला होता. त्यांच्या शब्दाचा मान ठेऊन आंदोलन स्थगित केले होते. विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जाणार नाही. तोपर्यंत त्या विमानतळाच्या कार्यक्रमास जाणार नसल्याची भूमिका आम्ही घेतली होती. त्यामुळे आज उद्घाटनाला जाणार नाही असे बाळ्या मामा यांनी सांगितले. परंतु ज्या दिवशी विमानतळाला राष्ट्रीय नेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला नाव दिले जाईल. त्या दिवशी लाखोंच्या संख्येने जाऊ आणि मुख्यमंत्र्यांचा सत्कार करु असेही त्यांनी सांगितले.