Navi Mumbai International Airport : ठाणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय पक्ष, संघटना व स्थानिक भूमिपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल आणि वेळकाढूपणा सुरु आहे. जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा..पाटील यांचे नाव देणार नाही, तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

खासदार सुरेश म्हात्रे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे समाज कार्य केवळ नवी मुंबई किंवा ठाणे, पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हते. तर दि.बा.पाटील यांच्यामुळे देशात स्त्री भ्रूण हत्या कायदा पारीत झाला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन अथवा भरीव मोबदला देण्याचे कार्य देखील त्यांनी केले. देश स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी कुळ कायदा करण्यासाठी इंग्रजांविरोधात आंदोलन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती.

देश स्वातंत्र्यानंतर कुळ कायदा मंजूर झाला. ज्याचा फायदा आज देशातील सर्व शेतकऱ्यांना होत आहे. ओबीसी आरक्षणासाठी देखील दि.बा.पाटील यांचे मोठे योगदान आहे. दि.बा.पाटील हे पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, राज्याच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते असा त्यांचा राजकीय,सामाजिक व कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. एक थोर समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे पहिले पाहिजे आणि त्यासाठीच नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव द्यावे अशी आमची मागणी असल्याची माहिती खासदार बाळ्या मामा यांनी दिली.

कार रॅलीचे आयोजन

  • रविवारी १४ सप्टेंबरला दि.बा.पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव मिळावे यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गाव अशी भव्य कार रॅली काढली जाणार आहे. या कार रॅलीत किमान दोन हजारांहून अधिक चार चाकी गाड्या असणार आहेत. या कार रॅलीत ठाणे,पालघर,रायगड,नवी मुंबई,मुंबई येथून हजारोंच्या संख्येने आगरी कोळी बांधव उपस्थित राहणार आहेत. ही कार रॅली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी असणार असून हा केवळ ट्रेलर आहे, आम्हाला चित्रपट दाखवायला भाग पाडू नका, जो पर्यंत विमानतळाला नाव देणार नाही तो पर्यंत विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही असा इशारा देखील खासदार बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे.