ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर येथील गायमुख घाटात मिरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या कामामुळे मागील दोन दिवसांपासून येथील रहिवाशांना प्रचंड वाहतुक कोंडीचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी आणि सोमवारी या मार्गावर दिवसभर वाहतुक कोंडी होती. त्याचा परिणाम मुंबई अहमदाबाद मार्गावरील वाहतुक व्यवस्थेवर झाला होता.
वसई-विरार, मिरारोड, भाईंदर भागातून हजारो नागरिक ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने घोडबंदर मार्गे वाहतुक करतात. परंतु कोंडीमुळे वाहन चालकांना अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागत होता. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. अवजड वाहनांची वाहतुक पोलिसांनी कशेळी-काल्हेर, मुंबई नाशिक महामार्गे वळविल्याने पर्यायी मार्ग देखील कोंडू लागले आहेत.
घोडबंदर येथील गायमुख घाटाजवळील पेट्रोल पंप भागात घाट मार्गाच्या दुरुस्तीचे काम मागील दोन दिवसांपासून सुरु आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे येथील वाहने टप्प्या-टप्प्याने एक मार्गिकेवरून सोडली जात आहे. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसू लागला आहे. घोडबंदर घाट मार्गावरून जेएनपीए बंदरातून सुटणारी अवजड वाहने गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतुक होत असते. तर वसई-विरार, मिरा भाईंदर भागातील हजारो नोकरदार, व्यवसायिक ठाणे, नवी मुंबई, भिवंडीच्या दिशेने प्रवास करतात. घोडबंदर घाटात दुरुस्ती कामासाठी अवजड वाहनांना बंदी लागू केली असल्याने येथील वाहतुक कशेळी-काल्हेर-भिवंडी आणि मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गी वळविली असून येथेही वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. कशेळी-काल्हेर-भिवंडी मार्गावर पूर्णा ते कामतघर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मुंबई नाशिक महामार्गावर काही ठिकाणी वाहतुकीचा भार वाढून कोंडी झाली होती.
घाट मार्गावरील दुरुस्ती कामामुळे गायमुख घाट ते फाऊंटन पर्यंत वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. वाहने २० मिनीटे टप्प्याटप्प्याने सोडली जात असल्याने कोंडीत वाढ होते. वाहतुक कोंडीमध्ये बसगाड्या, हलकी वाहने अडकून होत्या. रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस वाहतुक कोंडी झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. गायमुख घाट मार्गावरील दुरुस्तीच्या कामाची मुदत १४ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे आणखी एकदिवस वाहन चालकांना कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
घोडबंदर मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. वाहतुक कोंडीमुळे प्रवास कठीण झाला आहे. वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. – ऋषी जाधव, प्रवासी.
ठाणे पोलिसांनीही घोडबंदर मार्गावरून वाहतुक टाळण्याचे किंवा पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले. परंतु या मार्गावरून प्रवास टाळल्यास प्रवास कोणत्या पर्यायी मार्गाने करावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.