ठाणे – श्रावण महिन्याला सुरूवात झाली की चाहूल लागते ती हिंदू सणांची. श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. ठाण्यातील संकल्प इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्लिश लँग्वेज विथ इंडियन क्लचर या ब्रीदवाक्यानुसार अनोखा नागपंचमी सण साजरा करण्यात आला. शाळेत चक्क नागोबाचे वारूळ अवतरल्याचे पाहायला मिळाले अन् चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातात नाग.

आषाढ महिना संपला की श्रावणाची ओढ लागू लागते. श्रावण महिना हा उत्सव आणि उत्साहाने भरलेला महिना असतो. या महिन्यात कधी पावसाच्या हलक्या सरी तर कधी कोवळे ऊन असते. याच महिन्यात हिंदू सणांना सुरूवात होते. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, गोकुळाष्टमी अशा सणांची पर्वणी सुरू होते. याच महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ठाण्यातील संकल्प इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्लिश लँग्वेज विथ इंडियन कल्चर या उक्तीनुसार अनोखा नागपंचमी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत नागोबाच्या भल्या-मोठ्या वारुळाची प्रतिमा साकारण्यात आली होती. तर नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्नेक मेकिंग विथ पेपर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांनी कागदाचे विविध नाग तयार करून आणले होते.

या प्रतिकृतींचे शिक्षकांनी पूजन केले. कागद आणि शाडू मातीच्या साहाय्याने नागांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी झिम्मा, फुगड्या खेळत, फेर धरत आणि गाणी गात नागपंचमी सण साजरा केला. विद्यार्थ्यांमध्ये नागांविषयी माहिती मिळावी यासाठी भारतातील विषारी आणि बिनाविषारी सापांची नावे असणारा फलकही लावण्यात आला होता. तसेच वर्गा वर्गातही त्याबद्दल माहिती सांगण्यात आली.

अनोखी नागपंचमी

संकल्प शाळेत टाकाऊ पासून टिकाऊ असे नागोबाचे वारूळ तयार करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी कागद, शाडू मातीच्या साहाय्याने नागाच्या विविध प्रतिकृती तयार केल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शाळेचे संस्थेचे पदाधिकारी डॉ. राज परब आणि मुख्याध्यापिका ज्योती परब यांच्या संकल्पनेतून अनोखा नागपंचमी सण साजरा करण्यात आला. यावेळी वारुळाची प्रतिकृती तयार करण्याचे काम चित्रकलेचे शिक्षक सागर सावंत आणि प्रणाली गिरी यांनी केले. या कार्यात चैतन्य इंगळे, ध्रुव तिवारी, प्रथमेश, मयंक तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.तर, नर्सरी आणि इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी पारंपारिक वेशात उपस्थित होते.