उल्हासनगरः उल्हासनगर जवळच्या भाल येथील सीताराम म्हात्रे नगर या परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल १७ लाखांचा मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जय संजय रेवगडे आणि साहिल किरण कांगणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडे अमली पदार्थ सापडल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर परिमंडळ चारच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसात अमली पदार्थांचे सेवण आणि विक्रीबाबत अनेक गुन्हे दाखल होत असताना ही कारवाई गुन्हे शाखेने केल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्चचिन्ह उपस्थित होते आहे.

गेल्या काही दिवसांपासून परिमंडळ चारमध्ये अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अमली पदार्थाच्या आहारी तरूण पिढी गेल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक शौचालये, मोकळी मैदाने, निर्जन ठिकाणी अनेक तरूणांना पोलिसांनी अमली पदार्थ असलेल्या गांजा सेवन करताना पकडले आहे.

त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केला होता. त्यानंतर भगतसिंग नगर परिसरात एकाच आठवड्यात दोनदा कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. यातही हजारो रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. परिमंडळ चारच्या क्षेत्रात या घटना सातत्याने होत असताना पोलिसांकडूनही कारवाई होते आहे. मात्र असे असतानाही अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ते पदार्थ बाळगण्याचे प्रकार समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्हासनगरच्या भाल गावातील गुरूकूल हायस्कुलजवळ सिताराम म्हात्रे नगर, चिकणकर विट भट्टीजवळ हाजीमलंग रस्त्यावर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत कल्याण येथे राहणाऱ्या जय संजय रेवगडे याला ६३.६ ग्रॅम वजानाचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या मेफेड्रोनची किंमत १२ लाख ७२ हजार इतकी आहे. तर किरण कांगणे याने आपल्या ताब्यात २१.५ ग्रॅम वजनाचा ४ लाख ३० हजार रूपये किमतीचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ बाळगला म्हणून त्यालाही अटक करण्यातआली आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांच्या डोळ्याखालून ही बाब कशी सुटली असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.