Manoj Jarange Patil Mumbai Protest नवी मुंबई ठाणे: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. नवीमुंबईत देखील काही मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. नवीमुंबई महापालिका आणि सिडकोच्या मार्फत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतू, ज्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे, त्याठिकाणी पाण्याची सुविधाच नाही, जेवणाची व्यवस्था नाही, स्वच्छता गृहांची व्यवस्था नाही यामुळे आंदोलकांचे हाल होत आहेत. श्रीमंत महापालिका पाणी का देत नाही असा आरोप आंदोलक करु लागले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. यात मराठवाडा आणि विदर्भ मधील मराठा आंदोलकांचा सहभाग सर्वात जास्त आहे. या भागातील मराठा बांधव हे मुंबई, ठाण्यासह नवीमुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.
नवी मुंबई महापालिकेने या आंदोलकांची राहण्याची व्यवस्था सिडको एग्जिबिशन सेंटर मध्ये केली आहे. शेकडो मराठा आंदोलक याठिकाणी वास्तव्यास आहेत. परंतू, नवीमुंबई महापालिका आणि सिडकोने राहण्याची व्यवस्था जरी केली असली तरी याठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, विद्यूत व्यवस्था नाही, सर्व स्वच्छतागृह बंद तसेच जेवणाची देखील व्यवस्था नसल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे.
आमचा संयम सुटल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू
आमच्या जेवनाची व्यवस्था केली नाही तरी चालेल आम्ही महिनाभर पुरेल इतके रेशन घेऊन आलो आहोत. परंतू, आम्हाला पाणी आणि विद्यूत पुरवठा करुन द्यावा. याठिकाणी विद्यूत व्यवस्था नसल्यामुळे आम्हाला प्रचंड डास चावत आहे. तसेच स्वच्छतागृह बंस असल्यामुळे आमची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत.
मनोज दादा जोपर्यंत आम्हाला बोलक नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही लढणारे मराठा आहोत. मराठाचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल तर, तो जाणून घ्या मराठा कधीच कोणापुढे झुकत नाही आणि झुकणार देखील नाही. त्यामुळे महापालिकेने पाण्याची सुविधा तसेच विद्यूत व्यवस्था केली नाही तर, आमचा संयम सुटेल आणि रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू असा इशारा संतप्त मराठा आंदोलकांनी नवी मुंबई महापालिकेला दिला आहे.