कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ एका प्रवाशाच्या अंगावर रात्रीच्या वेळेत रिक्षा घालून प्रवाशाला जखमी करण्याचा प्रयत्न एका मुजोर रिक्षा चालकाने केला असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघडकीला आला होता. आता डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्थानकाजवळ पाटकर रस्त्यावर कॅनरा बँकेच्या समोरील भागात रिक्षा चालकांनी शुक्रवारी सकाळी एका रुग्णवाहिकेची वाट अडवून धरल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

रुग्णवाहिका चालकाला तातडीने एक रुग्ण घेण्यासाठी जायचे होते. रुग्णवाहिका चालक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून पाटकर रस्त्याने शुक्रवारी सकाळी चालला होता. या रस्त्यावरील कॅनरा बँक एटीएमसमोर रुग्णवाहिका येताच येथे नेहमीप्रमाणे स्कायवाॅकच्या उतरणीच्या मार्गावर मुख्य वर्दळीचा रस्ता अडवून काही मोजके रिक्षा चालक प्रवासी घेण्यासाठी उभे असतात. रिक्षा वाहनतळ सोडून उभ्या असलेल्या या रिक्षा चालकांमुळे पाटकर रस्त्याची एक बाजुची मार्गिका पूर्णपणे वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांना येजा करण्यासाठी बंद असते.

रस्ता का बंद केला, असा प्रश्न या रिक्षा चालकांना केला तर ते संघटितपणे ते प्रवाशांच्या अंगावर येतात. असा अनुभव अनेक प्रवाशांना असल्याने ते या रिक्षा चालकांशी वाद घालत नाहीत. शुक्रवारी सकाळी एक रुग्णवाहिका चालक पाटकर रस्त्याने रुग्ण घेण्यासाठी चालला होता. चालकाला पाटकर रस्त्याने पुढे जायचे होते. पण या रस्त्यावर कॅनरा बँकेच्या एटीएमसमोर मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा बाजुला करण्यास नकार दिला. आणि रुग्णवाहिका चालकाला दुसऱ्या रस्त्याने जाण्याची सूचना केली. या रस्त्याने जाण्यास तुम्हाला जागा नाही, अशी उत्तरे रिक्षा चालक रुग्णवाहिका चालकाला देत होते.

काही पादचारी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्या म्हणून कॅनरा बँकेसमोरील रिक्षा चालकांना सांगत होते. पण रिक्षा चालक अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रुग्णवाहिका चालक रस्ता मोकळा करून देण्यासाठी इशारा भोंगा सारखा वाजवत होता. त्यांना रिक्षा चालक दात देत नव्हते. अखेर मोठ्या मुश्किलीने रिक्षा चालकांनी आपल्या पादचाऱ्यांच्या सूचनेवरून रिक्षा काही वेळाने बाजुला करून घेतल्या आणि रुग्णवाहिका चालकाला काही वेळाने तेथून जाऊन देण्यास जागा करून दिली.

त्यामुळे रस्ता आणि स्कायवाॅकचा उतार रस्ता अडवून बसणाऱ्या या रिक्षा चालकांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. कल्याण, डोंबिवली शहरात दिवसेंदिवसें काही मोजक्या रिक्षा चालकांची मुजोरी वाढत चालल्याने प्रवासी हैराण आहेत. गेल्या आठवड्यात कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात प्रवाशाशी अरेरावी करणाऱ्या मलंग रस्ता भागातील नांदिवली तर्फ येथील एका रिक्षा चालकाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी सहा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला.

या भागात व्यापाऱ्यांच्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवण्यात येतात. ही वाहने वाहतुकीला अडथळा येत आहेत. रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांचे परवानाचे उपप्रादेशिक परिवहन विभागाने रद्द करण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.