डोंंबिवली : नवी दिल्ली ते उरण जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मार्गाच्या कामासाठी निळजे येथील रेल्वे मार्गावरील नवीन उड्डाण पुलाचे काम येत्या चार महिन्याच्या काळात रेल्वे प्रशासनाला पूर्ण करायचे आहे. या कामासाठी कल्याणकडून शिळफाटा दिशेने जाणारी वाहतूक या कामाच्या कालावधीत बंद राहणार आहे. या चार महिन्याच्या कालावधीत कल्याणकडून शिळफाटा दिशेने जाणारी एक मार्गिका बंद राहिली तर वाहतुकीवर काय परिणाम होतो याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवार (ता. ७) रात्री १२ ते रविवार (ता.९) रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान शिळफाटा रस्त्यावरील शिळफाटा दिशेने जाणारी वाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ही अधिसूचना काढली आहे. निळजे रेल्वे उड्डाण पुलाखाली दुमजली मालवाहू डबे रेल्वे पुलाखालून जातील अशा पध्दतीने या पुलाची उंची वाढविण्याचे काम रेल्वेकडून करण्यात येणार आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत कल्याणकडून शिळफाटा जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्ते बंदचा वाहतुकीवर काय परिणाम होतो याचा विचार करण्यासाठी येत्या शुक्रवार ते रविवार एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे.
रस्ता बंद, पर्यायी मार्ग
कल्याणकडून शिळफाटा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे कमान येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने निळजे कमान येथून उजवीकडे वळण घेऊन लोढा पलावाकडून कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीवरून महालक्ष्मी हाॅटेलपर्यंत जाऊन पुढे इच्छित स्थळी जातील. लोढा पलावा, एक्सपेरिया माॅलकडून कल्याण, डोंबिवलीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निळजे पूल चढणीजवळ प्रवेश बंद आहे. ही वाहने शिळफाटा दिशेने जाऊन देसाई खाडी पुलावरून सरस्वती टेक्सटाईल्स समोरून उजवीकडे वळण घेऊन नवीन पलावा उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी जातील. मुंब्रा कल्याण फाटाकडून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना कल्याण फाटा दत्त मंदिर येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने मुंब्रा बाह्य वळण रस्ता खारेगाव टोल नाक्यावरून इच्छित स्थळी जातील.
कल्याण, डोंबिवलीतून मुंब्रा कल्याण फाटा दिशेने जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना काटई चौक येथे प्रवेश बंद आहे. ही वाहने काटई चौक (बदलापूर रस्ता) खोणी, तळोजा मार्गे इच्छित स्थळी जातील. नवी मुंबई, तळोजाकडून येणाऱ्या वाहनांना खोणी निसर्ग हाॅटेल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने काटई बदलापूर रस्त्याने मलंगगड रस्त्यावरील नेवाळी नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. कर्जत, बदलापूर, अंबरनाथकडून काटई चौक (बदलापूर फाटा) येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खोणी निसर्ग हाॅटेल येथे प्रवेश बंद असणार आहे. ही वाहने खोणी तळोजा एमआयडीसीमार्गे जातील.
हलक्या वाहनांसाठी मार्ग
नवी मुंबई परिसरातून कल्याणकडे जाणाऱ्या मोटार, दुचाकी स्वारांनी शीळ, दिवा, संदप रस्ता, मानपाडामार्गे जावे. ठाणे, मुंबईतून डोंबिवली, कल्याणकडे येणाऱ्या प्रवाशांनी माणकोली पूल, कोनगाव रस्त्याचा वापर करावा. कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, डोंबिवलीकडून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मोटार, दुचाकी स्वारांनी चक्कीनाका, मलंग रस्ता, नेवाळी नाका, खोणी, तळोजा मार्गे जावे.
