ठाणे: घोडबंदर येथील कासारवडवली भागात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उड्डाणपूलाच्या निर्माणाचे काम सुरू करण्यात आले असून या कामासाठी वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून वाहतूक बदल लागू केले आहेत. हलक्या वाहनांची वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली असून यामुळे कासारवडवली पेट्रोल पंप ते वेदांत रुग्णालयपर्यंत सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईर्पंत हे बदल लागू राहतील.

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या भागात मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. याच कामाचा भाग म्हणून मेट्रो मार्गिकेसोबत कासारवडवली, आनंदनगर आणि गायमुख भागात उड्डाणपूलांची कामे केली जाणार आहेत. यातील कासारवडवली उड्डाणपूलाचे आणि मेट्रोचे काम प्राथमिक टप्प्यात सुरू केले जात असून त्यासाठी मार्गारोधक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य मार्गिका अरुंद झाल्या आहेत. अरुंद मार्गामुळे वाहतुक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा… डोंबिवलीत उपायुक्तांच्या सततच्या पाहणीमुळे फेरीवाले गायब; फडके रस्ता, नेहरू रस्ता, रामनगर परिसर फेरीवाला मुक्त

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हलक्या वाहनांची वाहतूक सेवा रस्ते मार्गे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील सेवा रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी कासारवडली पेट्रोल पंप ते वेदांत रुग्णालयापर्यंत वाहने उभी करण्यास मनाई केली आहे.