पाणी उचल केंद्रात बिघाड; बदलापूर, अंबरनाथकरांची गैरसोय
बदलापूर : उल्हास नदीवर असलेल्या बॅरेज बंधाऱ्याच्या पाणी उचल आणि शुद्धीकरण केंद्रात बुधवारी सायंकाळी बिघाड झाल्याने गुरुवारी साडेतीन लाख बदलापूरकरांना पाणी आलेच नाही. या बिघाडाचा परिणाम आणखी दोन दिवस शहरातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
हा बिघाड नेमका कुणामुळे झाला हे अद्याप कळलेले नसले तरी जीवन प्राधिकरण या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचे सांगत आहे. तर जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आरोप महावितरणचे अभियंते करत आहेत.
बदलापूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे शहरात आजही पाणीटंचाई आहे. शहराच्या विविध भागात बारमाही पाण्याच्या समस्या उद्धभवतात. इतर वेळी महावितरण विभागाला दोष देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वेळ मारून नेत असते. मात्र, जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराचा फटका एकदा शहराच्या पाणीपुरवठय़ाला बसला आहे.
बुधवारी सायंकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी शुद्धीकरण प्रक्रिया ठप्प
झाली. याबाबत जीवन प्राधिकरणाकडून काही तासात यंत्रणा पूर्वपदावर आणली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत येथे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे गुरुवारी बदलापूर शहरातील सुमारे साडे तीन लाख नागरिक आणि अंबरनाथ शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना याचा फटका बसला.
या दोन्ही यंत्रणांच्या गोंधळामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला असून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शनिवारचा दिवस उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐन टाळेबंदीत पाणीबाणी ही परिस्थिती उद्भवल्याने बदलापूर, अंबरनाथकरांकडून संताप व्यक्त होत आहे.
दोन्ही यंत्रणांचे आरोप-प्रत्यारोप
विजेचा दाब वाढून यंत्रणेत बिघाड
जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याने हा प्रकार झाला. दोन्ही वाहिन्या सुरू ठेवल्याने यंत्रणेवर वीजेचा दाब वाढून जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाला. जलशुद्धीकरणाच्या पूर्व फिडरमधील वाहिन्यांवरही परिणाम झाला. हा बिघाड मोठा होता. मात्र, सुदैवाने या बिघाडादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही महावितरणच्या एका अभियंत्याने नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले. या प्रकारात महावितरण आपली बाजू वरिष्ठांकडे मांडणार आहे.
विजेच्या दाबात झालेल्या फरकामुळे यंत्रणा ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंत्रणा सायंकाळपर्यंत सुरळीत होऊन पाणीपुरवठा सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हा बिघाड कसा झाला याबाबत त्यांनी बोलणे टाळले. महावितरणचे कर्मचारी तपासणी करणार असून त्यानंतर बिघाड नेमका काय आहे ते कळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
-सुरेंद्र दशोरे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण