ठाणे : मुंबई, ठाणे, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्ग आणि त्यावरील उड्डाण पुलांवर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच संबंधित विभागांनी मास्टीकद्वारे काही ठिकाणी खड्डे भरणीची कामे केली आहेत. मात्र, खड्ड्यांच्या आकारापेक्षा जास्त जागा व्यापून बसविण्यात आलेल्या मास्टीक हे मुळ रस्त्याच्या उंचीपेक्षा जास्त उंच असून या उंचवठ्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहने आदळून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळेच आजारापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती घोडबंदर रस्त्याची असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे शहरातील मुख्य मार्गांपैकी घोडबंदर मार्ग हा सर्वात महत्त्वाचा आहे. उरण जेएनपीटी येथील बंदरातून हजारो अवजड वाहने गुजरात, वसई येथील गोदामाच्या दिशेने वाहतूक करतात. त्यासाठी ही वाहने घोडबंदर मार्गाचा वापर करतात. घोडबंदर मार्गालगत नागरी वस्ती वाढल्याने मार्गावर हलक्या वाहनांचा, महापालिका, राज्य परिवहन सेवा आणि खासगी बसगाड्यांचा भार देखील असतो. गेल्या सात ते आठ वर्षांपासून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील रस्त्यावर आणि सेवा रस्त्यात मार्गावरोधक बसविण्यात आल्याने रस्ता अरुंद होऊन त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून घोडबंदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत आहे. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तर मुख्य रस्त्याची दुरुस्ती (उड्डाणपूल वगळता) कापूरबावडी ते कासारवडवलीपर्यंतचा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) येते. या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले होते. यामुळे अपघात होण्याची भिती व्यक्त होत होती. खड्ड्यांच्या मुद्द्यावरून टिका होऊ लागताच संबंधित प्राधिकरणाने मास्टीक पद्धतीने खड्डे भरणीची कामे हाती घेतली. काही ठिकाणी कोल्डमिक्स काँक्रीटद्वारे खड्डे भरणी करण्यात आली. परंतु मास्टीक पद्धतीने केलेली खड्डे भरणी वाहतूकीसाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
वाघबीळ उड्डाणपूलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे डांबरीकरण करण्यात आल्याने रस्त्याचा काही भाग उंच-सखल झाला आहे. त्यामुळे अपघाताची भिती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. वाघबीळ उड्डाणपूलाच्या प्रवेशाजवळ एक उचंवटा निर्माण झाल्याने तो धोकादायक ठरत आहे. माजिवाडा पुलावरील मुंबई दिशेच्या मार्गिकेवरही खड्डे भरणी करण्यात आली आहे. खड्ड्यांच्या आकारापेक्षा जास्त जागा व्यापून बसविण्यात आलेल्या मास्टीक हे मुळ रस्त्याच्या उंचीपेक्षा जास्त उंच असून या उंचवठ्यावरून दुचाकी तसेच चारचाकी वाहने आदळून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. आनंदनगर परिसर, मानपाडा येथील उड्डाणपूलाखालील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. कापूरबावडी ते तत्वज्ञान विद्यापीठ भागातही अशीच परिस्थिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता मुख्य मार्गाला जोडण्याचे काम एमएमआरडीएकडून सुरु आहे. काही भागात सेवा रस्त्याच्या भागाचे काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु मुख्य रस्ता आणि नव्याने तयार करण्यात आलेला काँक्रीटचा रस्ता यामधील पातळी असमान झालेली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोडबंदर मार्गावर प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दररोज जीव मुठीत घेऊन येथून दुचाकी चालवावी लागते. काही ठिकाणी खड्डे भरले आहेत. पण तो भाग असमान झाला आहे. याठिकाणी वाहने आदळत असून त्यामुळे शारिरीक त्रासही होतो. – रोहीत पवार, रहिवासी.