डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचावाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर, खंडोबा मंदिर परिसरातील मनसे, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला बचत गट, या भागातील २० हून अधिक सामाजिक मित्र मंडळांच्या सुमारे २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोन दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याला भाजपचा झेंडा आणि कमळ शिक्का असलेला गमछा देण्यात आला.

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील मराठा मंडळ सभागृहात भाजपने कार्यकर्ता संवाद आणि पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी हे प्रवेश देण्यात आले. डोंबिवली पश्चिमेत गरीबाचावाडा, राजूनगर प्रभागात भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांची वतनदारी आहे. या प्रभागात ते मागील पंचविस वर्षापासून पालिकेत निवडून येतात. काही कारणांवरून विकास म्हात्रे सतत नाराज राहत असल्याने ते कोणत्याही क्षणी अन्य पक्षात जाण्याची शक्यता भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. आयत्यावेळी विकास म्हात्रे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर राजूनगर, गरीबाचावाडा प्रभागात कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

गरीबाचावाडा, महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसासटी, देवीचापाडा, राजूनगर, नवापाडा प्रभागांचा विचार करून या भागात भाजपची भक्कम ताकद असावी म्हणून भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या सहकार्याने डोंबिवली पश्चिमेतील पक्ष प्रवेशाला इच्छुक सामाजिक कार्यकर्ते, अन्य पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण, जिल्हाध्यक्ष परब हे कोकणी आहेत. त्यामुळे हे प्रांतीय ज्ञाती संबंध जोडून भाजपने डोंबिवली पश्चिमेत आपले पक्ष विस्ताराचे धोरण अवलंबले आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत देवीचापाडा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर आणि त्यांचे शंभरहून अधिक कार्यकर्ते, शिंदे शिवसेना उपशाखाप्रमुख संकेत देसाई, मनसेचे काही पदाधिकारी, याशिवाय घे भरारी महिला मंडळ, मित्र परिवार महिला मंडळ, संकेत देसाई मित्र परिवार, विजय भोईर मित्र परिवार आणि महिला मंडळ, शिवराज मित्र मंडळ, आरंभ मित्र मंडळ, बाल दत्तगुरू मित्रमंडळ, साई नगर मित्र मंडळ यांसह अनेक मंडळ आणि महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमाला शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शक विश्वास भोईर, जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रिया जोशी, जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, माजी नगरसेवक विशू पेडणेकर, माणिक म्हात्रे, प्रशांत पटेकर उपस्थित होते. येत्या काही दिवसात पश्चिमेतील अनेक महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर आपले सामाजिक स्तरावरील काम सुरू करायचे आहे. यामध्ये कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दहशतीचा अवलंब केला तर त्यांना पहिले समंजसपणे ,अन्यथा त्रास वाढला तर जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष परब यांनी दिला. ५८ कोटी डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा, राजूनगर परिसरातील काँक्रीट रस्ते, गणेशनगर गणेशघाट विकसित करणे कामासाठी भाजपने स्थानिकांना सुमारे ५८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा परिस्थितीत कोणी नाहक कुरबुऱ्या करत असेल तर ते योग्य नाही. अशी टिपणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली.