बदलापूर: साधी लोकल बंद करून वातानुकूलित लोकल सुरू केल्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागतो आहे. सोमवारी बदलापूर स्थानकात प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केल्यानंतर मंगळवारी पुन्हा संतप्त प्रवासी स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालया बाहेर जमले होते. त्यांनी एसी वातानुकूलित लोकल बंद करण्यासाठी घोषणाबाजी केली. वातानुकूलित लोकल मागून येणाऱ्या साध्या लोकलमधून प्रवास करून दाखवा, असे आवाहनही यावेळी संतप्त प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केले. त्यामुळे मंगळवारी पुन्हा बदलापूर रेल्वे स्थानकात गोंधळाचे वातावरण होते.

मुंबई स्थानकातून बदलापूरसाठी सुटणारी ५ वाजून २२ मिनिटांनी सुटणारी साधी लोकल वातानुकूलित लोकलमध्ये बदलल्याने प्रवाशांना त्यानंतरच्या खोपोली लोकलने प्रवास करावा लागतो आहे. एक लोकल अचानक कमी झाल्याने त्यानंतरच्या लोकलवर प्रवाशांचा भार वाढला आहे. प्रवाशांचे गर्दीमुळे हाल होत असून त्याविरुद्ध सोमवारी प्रवाशांनी बदलापूर रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. वातानुकूलित लोकल बंद करण्याच्या मागणीसाठी प्रवाशांनी घोषणाबाजी केली. मंगळवारीही अशाच प्रकारे प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. मंगळवारी महिला प्रवाशांची संख्या अधिक होती. रेल्वे अधिकाऱ्यांनी या गर्दीच्या लोकलमधून प्रवास करून दाखवावा मग आम्हाला हा प्रवास करायला सांगावे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला प्रवाशांनी यावेळी केल्या. त्यामुळे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी प्रवासी आक्रमक झाल्याचे दिसून आले.