डोंबिवली – नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले जाते. शहर परिसरातील नागरिक अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी होतात. चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झालेले असतात. रविवार, ३० मार्च रोजी चैत्रपाडवा असल्याने या दिवशी फडके रस्त्यावरील वाहतूक पहाटे चार ते दुपारी एक या काळात बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली.

ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून फडके रस्ता वाहतूक बंदची अधिसूचना काढण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहनांना या रस्त्यावरून प्रवेश असणार आहे. फडके रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. स्वागत यात्रेच्या मार्गात वाहनांचा अडथळा आणि कोंडी नको म्हणून वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान, सुभाषचंद्र बोस रस्ता, महात्मा फुले रस्ता, दिनदयाळ रस्ता, कोपर पूल, शिवमंदिर रस्ता, डाॅ. राजेंद्रप्रसाद रस्ता, मानपाडा रस्ता आणि फडके रस्ता असा स्वागत यात्रेचा मार्ग आहे.

प्रवेश बंद

फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक, आप्पा दातार चौक रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना रविवारी बंद असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारड सर्कल) मार्गे डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्याने ब्राह्मण सभेवरून फडके रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

डोंबिवली पश्चिमेकडून कोपर पुलावरून पूर्व भागात जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रम, नवी मुंबई पालिका उपक्रमाच्या बसना टिळक रस्ता येथे प्रवेश बंद केला जाणार आहे.

पर्यायी मार्ग

फडके रस्त्याकडे डोंबिवली पश्चिमकडून येणारी वाहने स. वा. जोशी शाळा नेहरू रस्ता, व्ही. पी. रस्त्याने इच्छित स्थळी जातील. कोपर पुलाकडे येणारी वाहने महात्मा फुले रस्ता, रेल्वे मैदान, गणेशनगर भागातून इच्छित स्थळी जातील. कल्याण डोंबिवली पालिका, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्त्यावरून पाटणकर चौक, मानपाडा रस्त्याने इच्छित स्थळी जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहरू मैदानात वाहनतळ

नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी डोंबिवली शहर परिसरातून अनेक नागरिक आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांनी येण्याची शक्यता आहे. या उत्सवप्रेमींच्या वाहनांसाठी नेहरू मैदान येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रविवारी पहाटे चार ते दुपारी एक वाजेपर्यंत या वाहतूक बंद नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.