डोंबिवली एमआयडीसीतील गणेशनगर भागातून जात असलेल्या नाल्यातून सोमवारी (२८ मार्च) दुपारी हिरव्या रंगाचे सांडपाणी वाहत असल्याचे रहिवाशांना दिसले. हे रंगीत पाणी पाहण्यासाठी परिसरातील रहिवाशांनी गर्दी केली होती. हिरव्या रंगाचे सांडपाणी कोणत्या कंपनीने नाल्यात सोडले आहे याचा शोध औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी घेत आहेत.

गणेशनगर भागातील रहिवाशांना सोमवारी (२८ मार्च) दुपारी नाल्याच्या एका बाजूने हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याचे दिसले. रंगीत पाण्यामुळे डोळे चुरचुरणे, रासायनिक दुर्गंधी येणे असे प्रकार अनुभवण्यास आले. यासंदर्भात समाज माध्यमावर एक चित्रफित प्रसारित झाली. ही माहिती मिळताच कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी नाल्याच्या प्रवाहातील हिरव्या सांडपाण्याची पाहणी केली. हे पाणी कोणत्या कंपनीमधून सोडण्यात आले याचा माग काढला.

कापड प्रक्रिया उद्योगातून प्रक्रिया केंद्रात सोडण्यात आलेले पाणी एका चेंबरमध्ये अधिक प्रमाणात झाल्याने ते चेंबरमधून बाहेर आले आणि नाल्यात वाहत गेले. चेंबरमधील पाण्याचा प्रवाह कमी होताच नाल्यात ते पाणी येण्याचे बंद झाले, असं या पाहणीत निष्पन्न झालं. “हेतुपुरस्सर हे पाणी नाल्यात कोणी सोडले नाही. हे पाणी रंगीत असते. ते प्रदूषित नसते. रंगीत कापड धुतल्यावर त्यामधील रंग निघून जातो. अशा प्रकारचे हे पाणी आहे. त्यामध्ये कोणतेही प्रदूषण घटक नाहीत,” असे सोनी यांनी सांगितले.

हेही वाचा : केंद्र सरकारचं राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचं लक्ष्य ३ वर्षात किती पूर्ण? महाराष्ट्राची स्थिती काय? CREA च्या अहवालात महत्त्वाचे खुलासे

गुलाबी रस्ते, हिरवा पाऊस, पिवळा प्रवाह अशा प्रकारची डोंबिवली एमआयडीसीतिल कंपन्यांची बदनामी करून काही घटक कंपन्यांना बंद करण्याचा घाट घालून आहेत. या सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणून शासनाने १५६ रासायनिक कंपन्या पाताळगंगा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला, अशी टीका उद्योजकांकडून केली जात आहे.