डोंबिवली : पुणे येथील निवासी असलेला एक १९ वर्षाचा तरूण जयपूर यशवंतपुरा एक्सप्रेसने दरवाजात उभे राहून प्रवास करत होता. एक्सप्रेस वसई रोड रेल्वे स्थानक ते जुचंद्र रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत असताना रेल्वे मार्गाजवळ उभ्या असलेल्या एका चोरट्याने तरूणाच्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडला. तो मोबाईल घेऊन चोरटा पळून गेला.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तरूणाने तक्रार केली आहे. गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलमधील एका प्रवाशाच्या हातावर काठीने फटका मारून त्याच्या हातामधील पडलेला मोबाईल घेऊन पळून जाणाऱ्या कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ भागातील तरूणाला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर जूचंद्र रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा असाच प्रकार घडला आहे.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की इम्रान चाँद सय्यद (१९) हा तरूण पुणे येथील कोंढवा रोड भागातील समता नगरमधील कुबेरा पार्क भागात राहतो. इम्रान सय्यद हा जयपूर यशवंतपुरा एक्सप्रेसमधून रविवारी रात्रीच्या वेळेत प्रवास करत होता. तो दरवाजात उभा होता. वसई रोड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर एक्सप्रेस जुचंद्र रेल्वे स्थानकाकडे येत होती. त्यावेळी एक्सप्रेसचा वेग कमी झाला. या संधीचा गैरफायदा घेत जुचंद्र रेल्वे मार्गाजवळ उभा असलेल्या एका तरूणाने एक्सप्रेसच्या दरवाजात हातात मोबाईल घेऊन उभ्या असलेल्या इम्रान सय्यद याच्या हातावर काठीने जोराचा फटका मारला. रेल्वे मार्गाजवळ उभा असलेला तरूण एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी उभा आहे, असे तक्रारदार तरूणाला वाटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अचानक हातावर फटका बसल्याने या फटक्याच्या माराने इम्रानचा मोबाईल जमिनीवर रेल्वे मार्गालगत पडला. एक्सप्रेस कोणत्याही वेग घेण्याची शक्यता असल्याने इम्रानला मोबाईलसाठी एक्सप्रेसमधून उतरणे शक्य झाले नाही. रेल्वे मार्गाजवळील चोरट्याने मोबाईल रेल्वे मार्गाजवळ पडताच तो उचलून पळ काढला. इम्रानने चोर म्हणून ओरडा केला. पण तोपर्यंत चोर पळून गेला होता. आपल्या समोरून चोर पळून गेल्याने इम्रान अस्वस्थ झाला. ४० हजार रूपये किमतीचा आय फोन कंपनीचा हा मोबाईल होता. मोबाईल चोरीला गेल्याने इम्रानने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे याप्रकरणाचा तपास करत आहेत.