ठाणे – रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांची गर्दी आणि त्यामुळे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी. यामुळे सर्वच प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. याच समस्येकडे लक्ष वेधत यंदा ठाकुर्ली (पूर्व) येथील मंगलमूर्ति गॅलेक्सी येथील राऊत कुटुंबियांनी “फेरीवाले-मुक्त स्थानक : सुरक्षित प्रवासी, सुरक्षित मुंबई” हा प्रभावी संदेश देणारी गणपतीची आरास साकारली आहे.

गणेशोत्सव हा भक्तिभावाचा उत्सवाबरोबरच सामाजिक संदेश देण्याची एक संधी देखील असते. या निमित्ताने अनेक सार्वजनिक मंडळ विविध देखावे उभारून सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधत असतात. याच पद्धतीने ठाकुर्ली येथील मंगलमूर्ति गॅलेक्सी येथील राऊत कुटुंबियांनी त्यांच्या घरच्या गणेशोत्सवात सर्व नागरिकांना भेडसावणारी समस्या देखावाच्या स्वरूपात मांडली आहे.

दरवर्षी सामाजिक जाणीव निर्माण करणारी सजावट साकारण्याची परंपरा असलेल्या या कुटुंबियांनी याआधी टोकियो ऑलिंपिक स्टेडियमची प्रतिकृती साकारून खेळाडूंना सन्मान दिला होता, टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती उभारून कॅन्सरविषयी जागरूकता पसरवली होती, तर कल्याण डोंबिवली येथे आयटी पार्क उभारावा अशी संकल्पना मांडून लोकल गाड्यांवरील प्रचंड गर्दीकडे लक्ष वेधले होते.

यंदा मात्र त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील वास्तव चित्र मांडले आहे. डोंबिवली, कल्याण, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, बोरिवली आणि नालासोपारा अशा प्रमुख स्थानकांबाहेर अनधिकृत फेरीवाले, अनियंत्रित रिक्षा-टॅक्सी स्टॅण्ड आणि प्रचंड गर्दी यामुळे प्रवाशांचे हाल होतात. रोजच्या गडबडीत ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटनेचा धोका वाढत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे की फेरीवाल्यांनी स्थानकांपासून किमान १५० मीटर अंतरावर राहावे. मात्र स्थानिक महापालिका आणि प्रशासनाकडून या आदेशाची अंमलबजावणी पुरेशी होत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

या पार्श्वभूमीवर सजावटीतून गणरायाला साकडे घालण्यात आले आहे की ” मुंबई आणि ठाणे येथील रेल्वे स्थानके फेरीवालेमुक्त, स्वच्छ आणि सुरक्षित व्हावीत. तसेच रिक्षा-टॅक्सींसाठी विमानतळाप्रमाणे शिस्तबद्ध रांगा असाव्यात, जेणेकरून प्रत्येक प्रवासी सन्मानाने, सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे प्रवास करू शकेल. असा संदेश यावेळी त्यांनी देखाव्यातून दिला आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही हा देखावा रुपेश राऊत यांच्या संकल्पनेतून वैभव रोडे, महेश नेमळकर, मंगेश तेली, राहुल दळवी, हर्षद उकर्डे, अश्विनी सुशांत भोवड, प्राजक्ता प्रवीण केळुसकर, सायली रोडे, तेजश्री तेली, पल्लवी राऊत, तृप्ती अभिजीत बिल्ले, सोनाली पाटील, ओंकार वैंगणकर यांनी साकारला आहे