ठाणे : दिवाळी पहाट निमित्त दरवर्षी ठाण्यातील राजकीय मंडळी सामाजिक संस्थांच्या नावाखाली राम मारुती रोड, मासुंदा तलावाजवळ,चिंतामणी चौक येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करतात. यावर्षी देखील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवाळी पहाट कार्यक्रमात तरुणांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरु असते. परंतु, यंदा या भागात दरवर्षी होणारा एक कार्यक्रम रद्द झाला आहे. महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. माणुसकीच्या नात्याने त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी ठाण्यातील एका पक्षाने दिवाळी पहाट साजरी न करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई, ठाणे तसेच उपनगरात दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी पहाट साजरी केली जाते. ठाणे शहरात गेले वर्षानुवर्ष दिवाळी पहाट निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ठाणे शहरात दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून विविध संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी मासुंदा तलाव आणि राम मारुती रोड परिसरात या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ध्वनीक्षेपकावर तसेच बँडवर गाणी वाजवून येथे उत्सव साजरा केला जात असल्याने ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून हजारो तरुण -तरुणी दिवाळी पहाट निमित्ताने येत असतात. मासुंदा तलाव, चिंतामणी चौक, राम मारुती रोड, गडकरी चौकात मोठ्याप्रमाणात गर्दी होते.

मासुंदा तलाव परिसरातील राजवंत ज्वेलर्स दुकानासमोरील भागात शिवसेना शिंदे गटाकडून एका संस्थेच्या माध्यमातून दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील कलाकार दरवर्षी भेट देतात. तर राम मारूती रोड परिसरात भाजपचे पदाधिकारी संजय वाघुले यांनी विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बाळकूम येथील राष्ट्रीय ब्रास बँड वादनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याच्या माजी महापौर तसेच शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक साजन बेंद्रे आणि डीजे नेश यांचा सहभाग असणार आहे. तर, ठाकरे गट आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गडकरी रंगायतन चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजित केला जातो. यंदाही ठाकरे गटाने पोलिसांकडून कायर्क्रमासाठी परवानगी घेतली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. परंतू, दिवाळी पहाट च्या पूर्वसंध्येला राजन विचारे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर यंदा दिवाळी पहाट चा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

राजन विचारे यांची फेसबुक वरील पोस्ट

मदत नव्हे कर्तव्य ; धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण

चला, या दिवाळीत माणुसकीचा एक दिवा बळीराजासाठी, शेतकऱ्यांसाठी, पूरग्रस्तांसाठी लावूया !

यंदाची दिवाळी पहाट रद्द करून शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात देणार

एकीकडे दिवाळीचा सण साजरा करणार पण दुसरीकडे आपला बळीराजा व अन्नदाता पुराच्या पाण्यामुळे संकटात आहे. या कठीण काळात त्यांना थोडा आधार देण्यासाठी, आम्ही पूरग्रस्त भागात जाऊन मदत केली आणि करणार आहोत.

यंदा आपण दिवाळी पहाट साजरी न करता ज्यांना जमेल त्यांनी पुढे येऊन, मराठवाड्यात जाऊन सढळ हाताने त्यांना मदत करणार आहोत. तुमची छोटीशी मदतही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते.