लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्वेतील कैलासनगर प्रभागाचे (प्रभाग क्रमांक १०३) भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा विकासक मनोज रामशकल राय यांच्या विरूद्ध एका महिलेने बुधवारी बलात्काराचा आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्वेतील राय रेसिडेन्सी गृह प्रकल्पाचे मनोज राय हे मुख्य प्रवर्तक आहेत.

गृहिणी असलेल्या ४० वर्षाच्या तक्रारदार पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, सन २०१५ ते मे २०२२ या कालावधीत भाजपचे माजी नगरसेवक मनोज रामशकल राय यांनी आपणास लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी येऊन वेळोवेळी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. या शारीरिक संबंधांमुळे मनोज राय यांच्यापासून आपण चारवेळा गर्भवती राहिले. आपल्या इच्छेविरूद्ध हा सगळा प्रकार मनोज राय यांनी केला.

आणखी वाचा-डोंबिवलीत रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; चाकू, दगडाचा वापर

गर्भवती राहिल्यानंतर चार वेळा आरोपी राय यांनी आपणास दमदाटी, शिवीगाळ, मारझोड आणि धमकी देऊन गर्भपात करण्यास जबरदस्तीने भाग पाडले. आपण या प्रकरणी कोठे बोलू नये म्हणून आपणास सतत मारहाण केली जात होती. आता हा सगळा प्रकार असह्य झाल्याने आणि आपणास लग्नाचे आमिष दाखवूनही ते मागील नऊ वर्षाच्या कालावधीत न पाळल्याने आपण ही तक्रार माजी नगरसेवक मनोज राय यांच्या विरूद्ध करत आहोत, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाच्या अधिक माहितीसाठी माजी नगरसेवक तथा विकासक मनोज राय यांना सतत भ्रमणध्वनीवर संपर्क केला. त्यांना लघुसंदेश पाठवून विचारणा केली. त्यांचा मोबाईल बंद येत होता.