डोंबिवली : ‘उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख प्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. पदाला न्याय देता येत नसल्याने आपण राजीनामा देत आहोत. आपण राजीनामा देत असलो तरी, एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहोत, असे थरवळ यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

थरवळ यांच्या राजीनाम्याने ‘उबाठा’ पक्षाला डोंबिवली भागात मोठा धक्का बसला आहे. डोंबिवली शहर परिसरात पक्षाला पुढे नेईल, असा एकमेव चेहरा सध्या ‘उबाठा’ पक्षात थरवळ यांच्या निमित्ताने होता. आगामी विधानसभा निवडणुकीत थरवळ ‘उबाठा’चे उमेदवार म्हणून ओळखले जात होते. अचानक थरवळ यांनी राजीनामा दिल्याने समर्थकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर फुटून बाहेर पडल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे हे मागील दीड वर्षाच्या काळात एकदाही डोंबिवलीत फिरकले नाहीत. तसेच पक्षनेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना पक्ष वाढीसाठी, आगामी निवडणुकांचा विचार करून एक कार्यक्रम द्यावा, अशी मागणी सातत्याने ‘उबाठा’च्या डोंबिवलीतील कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्याकडे ठाकरे पिता-पुत्र लक्ष देत नव्हते.

हेही वाचा >>> रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला, मंडपातील एसी-पंखे बंद? ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा संताप

एकीकडे शिंदे गट डोंबिवलीत विविध प्रकारचे प्रकल्प, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देऊन नागरिकांशी संवाद साधत होते. आपण मात्र असा एकही कार्यक्रम करू शकत नाही अशी खंत कार्यकर्त्यांची होती. चला होऊ द्या चर्चा, कार्यक्रम सुरू केला तर पोलिसांनी तो बंद पाडला. याविषयीही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य यांनी हा कार्यक्रम जोमाने सुरू ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना पाठबळ दिले नाही. एकीकडे शिंदे गटाकडून ‘उबाठा’तील अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या समोर विविध प्रकारच्या अडचणी उभ्या करून त्यांना शिवसेनेत येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. ‘उबाठा’त राहून नेते पाठबळ देत नसतील तर येथे काम करणे मुश्किल आहे, हा विचार करून थरवळ यांनी राजीनामा दिल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पडू शकत नाहीत. म्हणून आपण राजीनामा दिला आहे. शेवटपर्यंत मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे. – सदानंद थरवळ, ज्येष्ठ शिवसैनिक.