कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई चौक हा सर्वाधिक वर्दळ आणि वाहतूक कोंडीचा चौक म्हणून ओळखला जातो. या चौकातील अरुंद रस्त्याचा फटका वाहनांना बसत होता. काटईचे ग्रामस्थ आणि ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी या चौकातील कोंडीचे विश्लेषण केले. त्याची दखल अखेर ठेकेदाराला घ्यावी लागली. या चौकातील कोंडी होणाऱ्या कच्च्या वाढीव रस्त्याचे काम अखेर ठेकेदाराने सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नियोजन अभावामुळे घोडबंदर भागात पाणी टंचाई; येत्या शुक्रवारी पालिकेत होणार बैठक

काटई चौकात कर्जत, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागातून वाहने नवी मुंबई, ठाणे, दिशेने जाण्यासाठी येतात. डोंबिवली, कल्याण, भिवंडीकडून बदलापूर,कर्जतकडे जाणारी वाहने काटई चौकातून नेवाळी मार्गे इच्छित स्थळी जातात. काटई चौकाच्या अंबरनाथ बाजुने येणाऱ्या वाहनांच्या बाजुला रस्त्याच्या कडेला फेरीवाले, फळ, वडापाव विक्रेत्या यांच्या गाड्या आणि त्याच्या समोर खरेदीदारांची वाहने उभी असतात. या विक्रेत्यांच्या दुकानां समोरील रस्ता मातीचा असल्याने तेथे सततच्या पावसाने चिखल झाला आहे. या चिखलातून वाहन चालक येजा करण्यास तयार होत नसल्याने काटई चौक ते काटई उड्डाण पूल दरम्यान वाहन चालक दुहेरी मार्गिकेतून जातात. या मार्गिकेच्या लगतची मातीच्या रस्त्याची कच्ची पट्टी काँक्रिटीकरणाची केली तर या मार्गिकेतून वाहने काटई पूल दिशेने जातील. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर दिशेने येणारी वाहने थेट चौकात येऊन वळण न घेता नव्या मार्गिकेतून काटई पुलाकडे जातील, अशा सूचना स्थानिक आ. प्रमोद पाटील, ग्रामस्थ नरेश पाटील, शिळफाटा बाधित शेतकरी संघटनेचे गजानन पाटील यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, ठेकेदाराला केल्या होत्या. ‘लोकसत्ता’ने हीच भूमिका मांडली होती. पण त्याची दखल घेतली जात नव्हती.

हेही वाचा – ठाणे पालिकेचा अतिक्रमण विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे; भाजपचे आमदार संजय केळकर यांचे गंभीर आरोप

आता काटई चौकात दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कल्याण, बदलापूर दिशेने येणाऱ्या वाहनांची कोंडी होऊ लागल्याने ठेकेदाराने काटई चौकातील कोंडी सोडविणारा आतापर्यंत दुर्लक्षित असलेला महत्वपूर्ण रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.या रस्त्यामुळे काटई नाका ते काटई पूल दरम्यान वाहन चालकांना जाण्यासाठी तीन मार्गिका उपलब्ध होणार आहेत. रस्त्या लगतचा कच्चा रस्ता चिखल, पाण्याने भरला असल्याने त्यामधून कोंडीच्या वेळी फक्त दुचाकी स्वार जात होते. आता हा रस्ता काँक्रिटीकरणाचा करण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. येत्या पंधरा दिवसात हा रस्ता पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आहे.

फलक वाचण्यासाठी गर्दी
शिळफाटा बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने शिळफाटा रस्त्याचे काम रखडले आहे अशी माहिती देणारे फलक आणि यासंदर्भातील ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेल्या बातम्यांचे फलक देसई, खिडकाळी, घारीवली, मानपाडा, काटई, निळजे, पडले परिसरात शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आले आहेत. हे फलक वाचण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, पादचारी गर्दी करत आहेत.

वाहतूक पोलिसांचे आवाहन
लोढा पलावा चौक येथे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने लोढा पलावा, कासाबेला, कासारिओ, लोढा हेवन येथील रहिवाशांनी ३० ऑगस्ट पर्यंत चौकातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी सार्वजनिक बस, रिक्षा यांचा वापर करावा. यामुळे मुख्य रस्त्यांवरुन येजा करणारी वाहनेच धावणार असल्याने पलावा चौकात नियमित होणारी वाहन कोंडी होणार नाही. पलावा वसाहती मधील नागरिकांनी वाहतूक विभागाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

डोंबिवली मानपाडा ते शिळफाटा दरम्यान काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी डोंबिवलीतील प्रवाशांनी पत्रीपूल-दुर्गाडी-खारेगाव टोल नाका रस्ते मार्गाचा वापर करावा. डोंबिवलीतून नवी मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांनी प्रीमिअर कंपनी, आगासन गाव-दिवा-शीळ गाव ते मुंब्रा छेद रस्त्यावरुन नवी मुंबईत जावे.डोंबिवलीतून पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका, खोणी, तळोजा एमआयडीसी रस्ता ते पनवेल रस्त्याचा वापर करावा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road work has started to solve the traffic at katai chowk on shilphata road amy
First published on: 25-08-2022 at 14:17 IST