|| प्रसेनजीत इंगळे
फेरीवाले, गॅरेज, पार्किंग, आठवडा बाजार यांमुळे वाहतूक कोंडी
विरार : वसई-विरारमधील सर्वच रस्त्यांवर सध्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. बेकायदा फेरीवाले, दुकानदार, गॅरेज, वाहनांची पार्किंग आणि नियमांचे उल्लंघन करून भरणारे आठवडा बाजार यांमुळे शहरातील रस्ते कोंडले आहेत. वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
सध्या शहराला भेडसावत असलेली वाहतुकीची समस्या फेरीवाले आणि अतिक्रमणांमुळे अधिकच जटील होत चालली आहे. फेरीवाल्यांच्या संबधात कोणतेही धोरण महापालिका राबवत नसल्याने दिवसागणिक फेरीवाले आणि अवैध बाजारांनी रस्त्यांचा ताबा घेतला आहे. याचा त्रास सामान्य नागरिक आणि वाहनचालकांना होत आहे. वसई, नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकाच्या आसपासचा परिसर फेरीवाल्यांनी गिळंकृत केला आहे. फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याने पादचाऱ्यांना चालायलाही जागा मिळत नाही. रस्त्याच्या कडेला असलेले पादचारी मार्ग पूर्णत: फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
शहरातील अनेक रस्ते बेकायदा गॅरेज आणि सव्र्हिस सेंटर यांनी काबीज केले आहेत. वाहनांच्या अधिकृत सव्र्हिस सेंटर आणि गॅरेजचे दर अधिक असल्याने अनेक वाहनचालक रस्त्याकडेला असलेल्या सव्र्हिस सेंटर आणि गॅरेजमध्ये येतात. यामुळे रस्ते अरुंद होत असून वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. त्याशिवाय गॅरेजमधून येणारे तेलमिश्रित पाणी रस्त्यावरच सोडले जाते. त्यामुळे दुचाकींचे अपघात होत आहेत. विरार पूर्वेला आर. जे. रोड, चंदनसार, कोपरी, पश्चिमेला नवीन विवा कॉलेज रोड, नालासोपारा आचोळे रोड, संतोष भुवन रोड, वसईत १०० फूट रोड, पंचवटी नाका, अंबाडी रोड या रस्त्यांवर गॅरेज आणि सव्र्हिस सेंटर यांचे अतिक्रमण झाले असून पालिका प्रशासन त्यावर कोणतीही कारवाई करत नाही.
मीरा-भाईंदरचे फेरीवाले वसईत
वसई-विरार महापालिकेच्या शेजारी असलेल्या मीरा-भाईंदर शहर महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने तेथील फेरीवाल्यांचा भरणा वसई-विरारमध्ये होत आहे. त्यांची कोणतीही तपासणी न करता महापालिका ठेकेदार केवळ पावती फाडून त्यांना बसण्यासाठी जागा देत असल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांनी केला.
आठवडा बाजारांमुळे समस्यांत वाढ
सध्या वसई शहरात अनेक ठिकाणी बेकायदा आठवडा बाजार भरत आहे. गर्दीच्या ठिकाणी मोक्याची जागा पाहून हे आठवडा बाजार भरले जात आहेत. या बाजारांना महापालिकेची परवानगी नाही. मात्र या बाजारांना राजकीय वलय असल्याने महापालिका या बाजारांवर कोणतीही कारवाई करत नसल्याची माहिती भाजप नगरसेवक किरण भोईर यांनी दिली. या बाजारांमुळे वाहतुकीवर ताण पडत आहे.
फेरीवाला धोरणाची निर्मिती महापालिकेकडून करण्यात येत आहे. बेकायदा फेरीवाल्यांवर महापालिका सातत्याने कारवाई करत आहे. – किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महापालिका