scorecardresearch

उपनगरीय रेल्वेच्या जलद मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाडय़ांची धाव; स्वतंत्र मार्गिकेनंतरही वेळापत्रकावर परिणाम, लोकल प्रवासी त्रस्त

उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा तसेच अपघातांमध्ये घट व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका तयार केली आहे.

किशोर कोकणे
ठाणे : उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा तसेच अपघातांमध्ये घट व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका तयार केली आहे. त्यानुसार लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी आणि उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीस स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गाडय़ा या उपनगरीय रेल्वे मार्गिकेच्या जलद मार्गावरून सोडल्या जात आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बिघडत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य उपनगरीय रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांमधील गर्दीमुळे पडून काही प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. अनेकदा लांब पल्ल्यांच्या गाडय़ा या उपनगरीय रेल्वेगाडय़ांच्या आधी सोडल्या जात असल्याने उपनगरी रेल्वेचा खोळंबा होत होता. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने उपनगरीय रेल्वे गाडय़ांची सेवा वाढविणे, रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचा निर्णय घेतला होता.
२००८ मध्ये या मार्गिकेच्या कामास मंजुरी मिळाली होती. मात्र, ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू होण्यास २०२२ उजाडले. या मार्गिका सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बदलून काही गाडय़ांऐवजी वातानुकूलित रेल्वे सुरू केल्या. त्याचा परिणाम सामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू लागला. अशातच दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या रेल्वे या उपनगरीय रेल्वेच्या जलद मार्गिकेवरून सोडण्यास सुरुवात केली आहे. लांब पल्ल्यांच्या या गाडय़ांमुळे उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यावर प्रवाशांकडून टीका केली जात आहे.
विलंब टाळण्यासाठीच..
दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या रेल्वे या पारसिक बोगद्यातून सोडायच्या असल्यास ठाण्यापुढे दुसऱ्या रेल्वे रुळावर या गाडय़ा वळवाव्या लागतील. त्यामुळे इतर रेल्वे सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे या पारसिक बोगद्यातून तर दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ा उपनगरीय जलद रेल्वे मार्गिकेवरून सोडल्या जात आहेत. असे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
उपनगरीय प्रवाशांकडून सर्वाधिक महसूल रेल्वे प्रशासनास मिळतो. असे असतानाही रेल्वे प्रशासनाला लांब पल्ल्याच्या गाडय़ा उपनगरीय रेल्वे प्रथम चालविणे महत्त्वाचे वाटते. सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांचे हाल रेल्वे अधिकाऱ्यांना दिसत नाहीत. – सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा-पारसिक रेल्वे प्रवासी संघटना
प्रशासनाने उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका निर्माण केली आहे. परंतु त्याचा लाभ प्रवाशांना अद्याप मिळालेला दिसत नाही. लांब पल्ल्याच्या गाडय़ा उपनगरीय रेल्वे मार्गिकेवरून धावत असतील. तर ही उपनगरीय रेल्वे प्रवाशांची फसवणूक आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. – लता अगरडे, सरचिटणीस, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Run longdistance trains fast track suburban railways impact schedule after separate lanes local commuters suffer amy

ताज्या बातम्या