शिंदे गटानं बंडखोरी करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांमध्ये सातत्याने वाद चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून शिंदे गटानं शिवसेनेच्या शाखांवर दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यातून होणाऱ्या वादाचं पर्यवसान सोमवारी संध्याकाळी ठाण्यातील शिवसेना शाखेसमोर झालेल्या राड्यामध्ये झालं. यावरून आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर तोंडसुख घेतलं असून त्यांना जाहीर आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यात काय घडलं?

सोमवारी संध्याकाळी ठाण्यातील शिवाई नगर येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापसांत भिडले. शिंदे गटानं शिवाई नगर शिवसेना शाखा कुलूप तोडून ताब्यात घेतली. यानंतर ठाकरे गटाकडून त्याला विरोध करण्यात आला. घोषणाबाजीही झाली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण जालं होतं. “ही शाखा आमची आहे. प्रताप सरनाईकांनी ही शाखा बांधली. ठाकरे गटानंच चुकीच्या पद्धतीने शाखेला कुलूप लावलं होतं”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

“…मज्जा आहे बाबा एका माणसाची”, मनसेचा ठाकरे गटाला टोला; पंतप्रधानपदाचा केला उल्लेख!

संजय राऊतांचं प्रत्युत्तर

दरम्यान, ठाण्यातील प्रकारावर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्याप्रकारे पोलीस, सत्तेचा वापर करून जे काही ओरबाडून नेलं जात आहे, ते सगळं आम्ही परत मिळवू. हे फक्त काही दिवसांसाठी आहे. ना ही सत्ता राहील, ना ही दादागिरी राहील. पोलीस आमच्या लोकांविरोधात सत्तेचा वापर करत आहेत. याचा अर्थ तुम्ही लोक घाबरला आहात. जर मर्द आहात तर समोर येऊन आमच्याशी लढा. बघून घेऊ”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“खेडच्या सभेनंतर पायाखालची जमीन सरकली आहे”

“हे काही ठिकाणी ठाण्यातच चाललंय. या गटाचं अस्तित्व ठाण्यातच आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांचं काम नाही. मर्द असाल तर समोर या. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका. खेडच्या सभेनंतर सगळ्यांच्या पायाखालच्या जमिनी सरकल्या आहेत. कसब्यातला विजय, चिंचवड – भाजपाचा विजय नाही. हे सगळं पाहिल्यावर भाजपा किंवा मिंधे गट दुसरं काय करणार? पण आमचा शिवसैनिक मागे हटणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

“अमेरिकेनं लादेनला मारलं, त्याची कबर…”, इम्तियाज जलील यांना संजय शिरसाट यांचा टोला; म्हणाले, “बिर्याणी खाऊन..”

“मी त्यांना सांगतो, ठाण्यात जे चाललंय, ते थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपा तुमचा वापर करतोय, हे तुम्हाला भविष्यात कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे. पोलिसांचा वापर करून जर तुम्ही शिवसैनिकांना ताब्यात घेत असाल, तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारं नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटाला सल्ला दिला आहे.

“कोणत्याही रंगावर कुणाची मक्तेदारी नाही”

“कोणत्याही रंगाची कुणावर मक्तेदारी नसते. पण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवलं आहे”, असंही राऊत रंगपंचमीच्या निमित्ताने म्हणाले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams shinde group naresh mhaske on thane branch office issue pmw
First published on: 07-03-2023 at 10:27 IST