वसई परिसरात सप्तपर्णी झाडाच्या फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. वसईत रस्त्याच्या दुतर्फा ही फुले रात्रीच्या वेळेत पडत असून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोहीत करत आहेत.
जंगलात हिंस्र श्वापदांचा, तर शहरात भुतांचा वावर असलेले झाड अशी दूषणे सप्तपर्णी झाडाला दिली जात असली तरी प्रत्यक्षात निसर्गातील वेगळ्या जातकुळीचे झाड म्हणून त्याची ओळख आहे. शहर किंवा जंगलाचे सौंदर्य वाढवण्याचे काम हे झाड करते. मात्र या झाडाबाबत अनेक अंधश्रद्धा असल्याने रस्त्यावरून एकटे या झाडाजवळून जाताना अनेकांना भीती वाटते.
आयुर्वेद आणि पर्यावरणाच्या दृष्टीने मात्र हे महत्त्वाचे झाड असल्याने वसईत ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा सप्तपर्णीची झाडे लावली आहेत. वसईतील माणिकपूर, भाबोळा नाका, स्टेला, पापडी, नवघर, पंचवटी नाका तसेच वसई पूर्वेकडे वसंत नगरी, एव्हरशाइन या परिसरात झाडांची संख्या मोठी असून ही झाडे या रस्त्याची शोभा वाढवत आहेत.
दुपारच्या रणरणत्या उन्हात चालताना झाडांच्या सावलीमुळे फारसा थकवा जाणवत नाही. सीमेंट-काँक्रिटच्या जंगलात ही झाडे निसर्गाचे रक्षण करतातच, परंतु शहराच्या सौंदर्यातही भर घालत आहेत. अशा या सप्तपर्णीचा सुगंध वसईमध्ये दरवळला असून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तो मोहून टाकत आहे.