कल्याण : कष्टकरी, चालक आणि हमाल अशी कामे करत सामाजिक कार्यात उतरलेल्या बदलापूर येथील साकीब गोरे या दृष्टी मित्र सामाजिक कार्यकर्त्याने नागरिक, विद्यार्थी यांचे दृष्टी दोष निवारणाचे काम हाती घेतले आहे. गेल्या ३४ वर्षाच्या कालावधीत सुमारे ४० लाखाहून अधिक नागरिकांचे दृष्टी दोष निवारणाचे काम दृष्टी मित्र गोरे यांनी केले आहे. आता महाराष्ट्रात गतिमानतेने हे काम साकीब गोरे यांनी हे काम सुरू केले आहे. या दृष्टी दोष निवारण उपक्रमाचा कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यायात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला आयुष्यमान भारतचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे, जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार निरंजन डावखरे, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, वैद्यकीय अधिकारी डाॅ. आशा गुंजाळ, डाॅ. दीपलक्ष्मी मेश्राम उपस्थित होते.

साकीब गोरे हे मूळचे बदलापूर येथील रहिवासी. घरची परिस्थिती अतिशय गरीबीची. इतर मुले शाळेत जातात म्हणून साकीब शाळेत जात होता. घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शाळेत घरून भोजनाचा डबा मिळत नव्हता. दुपारच्या सुट्टीत सर्व मुले भोजन करायची आणि साकीब यावेळेत भुकेने व्याकुळ असायचे.

आपण किती दिवस पोटात भूक ठेऊन शाळेत जायचे या उद्विग्नेतून साकीब यांनी शाळा सोडली. त्यानंतर मजुरी, ट्रकवर चालक आणि हमालीची कामे त्यांनी सुरू केली. बदलापूर परिसरात सामाजिक उपक्रम असले की तेथे साकीब अपेक्षा न ठेवता झटून काम करायचे. आमदार किसन कथोरे यांच्या नजरेत साकीब गोरे यांची मेहनत, कष्ट नजरेत आली.

आपले डोळे, नजर ही आपल्या शरीराचा खरी आत्मा आहेत. दृष्टी गेली, अंधत्व आले की माणूस काही करू शकत नाही. आपण दृष्टी दोष निवारणावर काम करू शकतो, असे साकीब यांनी ३५ वर्षापूर्वी आमदार कथोरे यांना सांगितले. कथोरे यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनातून साकीब गोरे यांनी सामाजिक कार्याचा भाग म्हणून देश, विदेशातील २९ लाख नागरिकांची आपल्या वैद्यकीय पथक आणि यंत्रणेच्या माध्यमातून नेत्र तपासणी केली आहे. दृष्टीदोष असलेल्या १८ लाख लोकांना मोफत चष्मे वाटप केले आहेत. ६५ हजार लोकांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत.

महाराष्ट्रासह देश, विदेशातील शाळा, महाविद्यालयांमध्ये दृष्टी दोष निवारण्याचे काम साकीब गोरे यांनी हाती घेतले आहे. जीवनदीप महाविद्यालयातील साडे सहा हजार विद्यार्थ्यांना दृष्टी दोष मुक्त करण्याचा संकल्प दृष्टी मित्र साकीब यांनी सोडला आहे. या दृष्टी दोष उपक्रमासाठी विदेशातील काही संस्थांची साकीब यांनी संलग्नता घेतली आहे.

सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, लेबनाॅन, इस्त्रायल, हैती, बोस्निया अशा एकूण १९७ देशांमध्ये दृष्टी दोष निवारण्यासाठी साकीब भ्रमंती करत आहेत. यावेळी देवाभाऊ नावाचा लवचिक व मजबूत चष्मा वाटप केला जात आहे.

डोळे चांगले असतील तर आपण शिक्षण घेऊ शकतो, वाहन चालवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाचे डोळे चांगले असावेत यासाठी आपण दृष्टी दोष निवारण उपक्रम ३४ वर्ष राबवित आहोत. हा उपक्रम आता शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रभावीपणे राबवला जाणार आहे. – साकीब गोरे दृष्टी मित्र, बदलापूर