ठाणे : महापालिका क्षेत्रात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला असतानाच, शहरात ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने डोके वर काढल्याचे समोर आले आहे. या आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. करोनाबरोबरच इन्फ्ल्युएंझा आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागल्याने आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरू झाली असून, यामुळे शहराची आरोग्य चिंता वाढली आहे.

ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरात करोना सक्रीय रुग्णांची संख्या ८५ इतकी झाली आहे. गुरुवारी शहरात २८ रुग्ण आढळून आलेले असून त्याचबरोबर एका ८२ वर्षीय रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. अचानकपणे झालेली रुग्ण वाढ आणि त्यात एका रुग्णाचा झालेला मृत्यू यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. असे असतानाच, राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण आढळून येत असून या आजाराने ठाणे शहरातही डोकेवर काढल्याचे समोर आले आहे. या आजाराचे शहरात सहा रुग्ण आढळून आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर करोना आणि इन्फ्ल्युएंझा बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिले आहेत.

हेही वाचा – नोकरीच्या आमिषाने कल्याणमधील रिक्षा चालकाची कोल्हापूरच्या भामट्याकडून फसवणूक

हेही वाचा – वकिलाच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये वकिलांची निदर्शने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका क्षेत्रात करोना आणि ‘एच ३ एन २’ चे रुग्ण आढळून आले असले तरी यावर तातडीने प्रतिबंध व्हावा यासाठी महापालिकेने संपूर्णत: तयारी केली असून या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता आणि न घाबरता आपल्या जवळच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले आहे. घसा दुखणे, नाक वाहणे किंवा चोंदणे, ताप येणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने जवळच्या आरोग्यकेंद्रात जाऊन तपासण्या कराव्यात आणि आजार अंगावर काढू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.