डोंबिवली – डोंबिवली शहर परिसरातील शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांनी मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिकेने आयोजित केलेल्या ‘हरित बाप्पा, फलित बाप्पा’ या शाडुच्या मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी पालिकेने गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला या उपक्रमाचे आयोजन केले होते.

डोंंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील बंदिस्त क्रीडागृहात शाडुच्या मातीपासून गणपती तयार बनविण्याची कार्यशाळा पालिकेने विनाशुल्क आयोजित केली होती. आयुक्त अभिनव गोयल यांच्या सूचनेप्रमाणे प्रकल्प प्रमुख आणि कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी महापालिका आणि एज्युकेशन टुडे फाऊंंडेशनच्या माध्यमातून या पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीसाठी या भव्य कार्यशाळेचे आयोजन केले होते.

या उपक्रमात सहभागी झालेल्या पाच हजार विद्यार्थ्यांनी सकाळी आठ ते दुपारी दीड या दोन सत्राच्या कालावधीत साडे पाच तासाच्या कालावधीत चार हजार ६०० शाडुच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविल्या. एकावेळी पाच हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी चार हजार ६०० गणेशमूर्ती बनविल्याच्या घटनेची इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे.

डोंबिवलीत पर्यावरणस्नेही गणेशोत्सव उपक्रमात शाडुच्या मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याच्या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी.

पालिकेने विद्यार्थ्यांसाठी शाडुची माती उपलब्ध करून दिली होती. ही माती विद्यार्थ्यांना गणपती मूर्ती तयार करण्यासाठी सहज वापरता येईल यासाठी माती मळवून देणे, त्याचे गोळे करून देण्यासाठी खास कारागीर याठिकाणी नियुक्त करण्यात आले होत. या उपक्रमात पालिक, खासगी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त राजेश सावंत आणि इतर अधिकारी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होते.

नागरिकांनी अधिकाधिक पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याकडे वळावे. निसर्ग, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण पर्यावरणाला हातभार लावू शकतो, असा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जाण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. नक्कीच या कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजात जाईल. – अभिनव गोयल, आयुक्त.

शाडुची माती, नैसर्गिक रंग, पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करून आपण पर्यावरणस्नेही गणपतीची मूर्ती तयार करू शकतो. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करू शकतो, असा संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पालिकेने समाजात दिला आहे. – रोहिणी लोकरे, प्रकल्प प्रमुख, कडोंमपा.

पर्यावरणाचा विविध स्तरातून होत असलेला ऱ्हास बघता किमान पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण हा ऱ्हास काही प्रमाणात थोपवू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात शाडुची माती जाणे खूप आवश्यक होते. कल्याण डोंबिवली पालिकेने विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणून शाडुच्या मूर्ती विद्यार्थ्यांकडून बनवून घेतल्या. कार्यशाळेतून बाहेर पडलेले हेच विद्यार्थी आता पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचे प्रचारक म्हणून काम करतील. – गुणेश अडवल, शिल्पकार व मूर्तीकार.