scorecardresearch

गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण; शहापूरमधील ३८७ गाव-पाडय़ांमधील रहिवाशांना मालकी मालमत्ता पत्र

शहापूर तालुक्यातील १९६ गावे, १९१ आदिवासी पाडय़ांमधील गावठाण क्षेत्राचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे.

Drone
(Photo- Reuters)

|| भगवान मंडलिक

शहापूरमधील ३८७ गाव-पाडय़ांमधील रहिवाशांना मालकी मालमत्ता पत्र

कल्याण : शहापूर तालुक्यातील एकूण ३८७ गाव-पाडय़ांमधील गावठाण भू-क्षेत्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम शासनाच्या भूमिअभिलेख, ग्रामविकास आणि सव्‍‌र्हे ऑफ इंडिया विभागांतर्फे सुरू करण्यात आले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत शहापूर तालुक्यातील १९६ गावे, १९१ आदिवासी पाडय़ांमधील गावठाण क्षेत्राचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. मागील अनेक वर्षांत गावठाण क्षेत्राची मोजणी, चिरे मोजणी करण्यात आली नाही. गावांमधील घरे, कुटुंबांची संख्या वाढली. त्या प्रमाणात गावठाण विस्तार झाला नाही.

गावठाण क्षेत्रावर शासनाचा अधिकार असल्याने घरमालक फक्त घरपट्टी भरण्यापुरता घराचा मालक आहे. गावठाण क्षेत्र सरकारी जागेत असल्याने ग्रामस्थांना या जागेचा सातबारा उतारा मिळत नाही. गावठाण क्षेत्रातील घर मालकांना त्यांच्या जागेचे मालक करावे, शासनाने त्यांना मालकी मालमत्ता पत्रक द्यावे, अशी मागणी महाराष्ट्राच्या विविध भागांतील जागरूक रहिवासी, लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे केली जात होती.

कल्याण तालुक्यातील करवले गावचे ग्रामस्थ रामदास म्हात्रे केंद्र, राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून गावठाण विस्तार, गावठाण क्षेत्रातील जमिनीची मालकीविषयी अनेक वर्षे पत्रव्यवहार करत आहेत. अशा मोजणीची मागणी विधायक क्रांती संघटनेने शासनाकडे केली होती. शहापूर तालुक्यातील गावठाण क्षेत्र ड्रोन माध्यमातून मोजणीचा शुभारंभ शहापूरजवळील कळंभे, दहागाव, कातबाव, बोरशेती, आसनगाव, गोठेघर-वाफे गावातून करण्यात आला. यावेळी शहापूर भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र लोंढे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ड्रोनमधील उच्च क्षमतेच्या दूरदर्शी छायाचित्र कॅमेऱ्यामधून गावठाण क्षेत्राचे भूमापन केले जात आहे. या छायाचित्रणाद्वारे उपलब्ध होणाऱ्या गावठाण क्षेत्राच्या प्रतिमांच्या माध्यमातून गावठाण, या क्षेत्रातील घरांचे नकाशे, अभिलेख सव्‍‌र्हे ऑफ इंडियाकडून तयार केले जातील. या अभिलेखांच्या माध्यमातून गावठाण क्षेत्रातील ग्रामस्थांना त्यांच्या जमीन क्षेत्राचे मालमत्ता प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून दिले जाईल, असे सर्वेक्षण अधिकाऱ्याने सांगितले.

गावांमधील वाद मिटणार

या मोजणीचे नकाशे, मालमत्ता प्रमाणपत्र ग्रामस्थांना उपलब्ध होणार असल्याने आतापर्यंत गावठाण क्षेत्रातील जमिनीवरून गावांमध्ये होणारे वाद थांबण्यास साहाय्य होणार आहे. या भूमापनासाठी शहापूर भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवा गावठाण क्षेत्र मोजणीसाठी वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भूमिअभिलेख विभागातील मोजणी, नकाशा प्रती मिळण्यास विलंब होऊ शकतो, असे उपअधीक्षक राजेंद्र लोंढे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Survey of villages by drone letter of ownership of property to residents akp

ताज्या बातम्या