डोंबिवली – डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या एक चहावालाने भारतीय सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या विविध भागातील महिलांकडून जमा झालेल्या या राख्या आहेत. यावेळी या चहावाल्याने ३५ हजाराहून अधिक राख्या, ९३७ फुटाचा तिरंगा आणि २१ ध्वज सीमेवरील जवानांच्या स्वाधीन करून रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित वासुदेव आचरेकर असे त्यांचे नाव आहे. प्रसिध्द चहावाला म्हणून ते ओळखले जातात. ते सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. व्यक्तिगत कितीही महत्वाचे काम असले तरी ते बाजुला ठेऊन मागील एकोणीस वर्षापासून रोहित आचरेकर रक्षाबंधन पूर्वी भारतीय सीमेवर जाऊन रक्षाबंधनाच्या दिवशी भारतीय सैनिकांसोबत देशातील विविध भागातील बहिणींनी दिलेल्या राख्या जवानांना बांधण्याचे काम करतात. एकाच दिवशी, एका वेळी सीमेच्या विविध भागात जाणे शक्य नसल्याने ते काही राख्या जवानांकडे सुपूर्द करतात.
आपण रक्षाबंधन काळात सीमेवर जवानांना राखी बांधण्यासाठी जाणार आहोत. यासाठी देशातील ज्या महिलांना सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या आपल्या वीर जवानांना राख्या बांधायच्या असतील त्या त्यांनी आपल्याकडे जमा कराव्यात, असे आवाहन आचरेकर वे टु काॅज फाऊंडेशन आणि रायडर्स क्लबतर्फे करतात. या आवाहनाला देशभरातील बहिणींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावेळी ३५ हजाराहून अधिक राख्या आचेरकर यांच्याकडे आल्या आहेत. या सर्व राख्या, सोबत तिरंगा ध्वज घेऊन ते पुढील आठवड्यात भारतीय सीमेवर पोहचणार आहेत.
या उपक्रमात कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर भागातील महिलांनी सहभाग घेतला आहे. मी डोंबिवलीकर सामाजिक संस्थेने या उपक्रमात सहभाग घेतला आहे. डोंबिवलीकर संस्थेचा या उपक्रमात मागील काही वर्षापासून सक्रिय सहभाग आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संग्रहित राख्या रोहित आचरेकर यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. वे टु काॅज फाऊंडेशन आणि रायडर्स क्लबतर्फे हा उपक्रम राबविला जातो. या संस्थेने चालूवर्षी १५ लाख रूपये निधी संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा निधी भारतीय सैन्य कल्याण निधीमध्ये जमा केला जातो. या निधीतून शहिद जवानांच्या कुटुंबीयांना अर्थसाहय्य केले जाते. या निधीचे संकलन संस्थेतर्फे सुरू आहे. आतापर्यंत दोन लाखाचा निधी जमा झाला आहे, असे आचरेकर यांनी सांगितले.
सोबतचा ९३७ फुटाचा तिरंगा द्रास, कारगील येथील कारगील वाॅर मेमोरिअल येथे सन्मानाने जवानांच्या सुपूर्द करण्यात येणार आहे. विविध प्रकारचे २१ ध्वज शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून सीमा भागात लावले जातील, असे आचरेकर यांनी सांगितले.
आमच्याकडे जमा होणारी प्रत्येकी राखी आणि त्यामधील धागा हा सीमेवरील जवानांप्रती असलेला आदर, स्नेहभाव आणि भारतीय तिरंग्याला सलाम आहे. सामाजिक, राष्ट्रीय भावनेतून हा उपक्रम राबवित आहोत.-रोहित आचरेकर,चहावाला.