कल्याण: महावितरणच्या वीज ग्राहकांना चढ्या दराची देयके महावितरणकडून पाठविण्यात आली आहेत. ठेव रकमेसाठी आग्रह धरण्यात येत आहे. ही चढे देयके भरणा न करणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाता आहे. हे वीज ग्राहकांवर अन्यायकारक असल्याने मंगळवारी डोंबिवलीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी कल्याणमध्ये महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कृतीशील कार्यक्रमात महावितरणची वीज देयके १ एप्रिलनंतर कमी दराने येतील. चढ्या दराचा कोणताही बोजा ग्राहकांवर टाकण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते. ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा चढ्या दराच्या ठेव रकमा स्वीकारण्यात येणार नाहीत, असे आश्वासन देऊनही यापैकी कशाचीही पूर्तता १०० दिवसांच्या कालावधीत मुख्यमंत्र्यांकडून झालेली नाही. त्यांनी लोकांना एप्रिल फूल बनविण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांना या वीज मीटरची संपूर्ण कार्यप्रणाली समजून सांगावी. घाईघाईने हे वीज मीटर ग्राहकांच्या माथी मारू नयेत, स्मार्ट मीटर योजनेंतर्गत ग्राहकांना कोणते फायदे होणार आहेत. या मीटरअंतर्गत ग्राहक हिताच्या कोणत्या सुविधा आहेत याची साद्यंत माहिती ग्राहकांना देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी महावितरणचे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कार्यकारी अभियंता सुनील वनमोरे, जगदीश बोडखे, नितीन काळे यांच्याकडे केली.

यावेळी ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर, शहरप्रमुख अभिजीत सावंत, तात्या माने, प्रकाश तेलगोटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.