ठाणे : दिवाळी निमित्ताने सोमवारपासून सुरु झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे रात्री हवेच्या गुणवत्तेमध्ये बिघाड होऊ लागला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्वळामधील आकडेवारीनुसार ठाणे जिल्ह्यातील मध्यरात्री हवेत पीएम २.५ चे घटक आढळून आले. पीएम २.५ घटक वाढल्यास वृद्ध तसेच श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी ते घातक ठरू शकते.

दिवाळी निमित्ताने ठाणे शहरात रात्री उशीरापर्यंत मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. अनेक ठिकाणी सोमवारी मध्यरात्री देखील फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात अनेक भागात हवा आणि ध्वनी प्रदूषण झाले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून यंत्रांद्वारे ठाण्यातील उपवन या निसर्गरम्य भागात आणि घोडबंदर येथील कासारवडवली भागात हवेची गुणवत्ता तपासली जाते.

ठाण्यातील उपवन येथील सोमवारी मध्यरात्री १२ वाजता पीएम २.५ चे प्रमाण ५०० इतक्या गंभीर पातळीवर नोंदविले गेले. तर कासारवडवली येथील हवा समाधानकार आणि चांगल्या गुणवत्तेत नोंदिवली. तरीही पीएम १० हा घटक हवेत होता. कल्याण येथील खडकपाडा भागातील पीएम २.५ चे प्रमाण ५०० इतके होते.

पीएम २.५ चे घटक सर्वात हानीकारक आहेत. हे कण नाकावाटे फुफ्फुसात सहज जातात. फुफ्फुसाच्या अतिशय खोलवर हे घटक पोहचतात. त्यामुळे दम्याचा त्रास असणारे, वृद्ध नागरिक यांच्या आरोग्यासाठी ते घातक असते. हे कण अत्यंत सूक्ष्म असतात आणि हवेत तरंगतात.

पीएम १० च्या संपर्कात आल्यास श्वसनाचे आजार वाढू शकतात. हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार असलेल्या नागरिकांसाठी ते धोकादायक ठरु शकते.

फटाक्यांच्या धूरामुळे रात्रीच्या वेळेत हवेची गुणवत्ता बिघडली असावी. वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी सावध राहणे आवश्यक असल्याचे वातावरण संस्थेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.