“राज्यात राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर त्यांचा दौरा निघाला असता का?”, असा सवाल उपस्थित करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर निशाणा साधल्याचे दिसून आले. आज (रविवार) अमित ठाकरे हे त्यांच्या महासंवाद दौऱ्यांतर्गत ठाणे शहरात आले होते. त्यावेळेस पत्रकारांसोबत अनौपचारीक चर्चा करत असताना ते बोलत होते.

माझा दौरा हा नियोजित दौरा आहे, त्यांचा… –

राज्यात मनविसे प्रमाणे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचाही दौरा सध्या सुरू आहे. या दौऱ्याविषयी त्यांना पत्रकारांनी विचारले असता, “माझा दौरा हा नियोजित दौरा आहे. त्यांचा दौरा आता सुरू झालेला आहे. राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर त्यांचा दौरा निघाला असता का असा प्रश्न पडतो.” अशी प्रतिक्रिया देत अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

डोंबिवली : पालिकांमध्ये वर्षानुवर्ष सत्ता उपभोगणारे सत्ताधारीच खड्ड्यांना जबाबदार – अमित ठाकरे

नागरिकांनी एकदा संधी द्यावी –

तसेच, शहरातील खड्ड्यांविषयी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई, ठाणे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांतील प्रवास टाळण्यासाठी मी रेल्वेने प्रवास करतो, असेही ते यावेळी म्हणाले. तर, नाशिकमध्ये मनसेने विकास केला होता. तेव्हा तेथील रस्त्यांवर खड्डे पडले नव्हते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नागरिकांनी एकदा संधी द्यावी, असेही यावेळी अमित ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

… तर हात सोडून प्रश्न मार्गी लावू –

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, महाविद्यालयातील वाढीव प्रवेश शुल्क अशा विविध मुद्यांसाठी महाविद्यालयांमध्ये मनविसेचे युनीट स्थापन केले जाणार आहे. महाविद्यालय प्रशासनाला सुरूवातीला हात जोडून विनंती करून प्रश्न मार्गी लावू. परंतु त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीतर हात सोडून प्रश्न मार्गी लावू. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.