ठाणे : येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कावेसर तलावालगत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभिकरणाच्या निर्णयाला या भागातील रहिवासी आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. या तलावाच्या रक्षणासाठी शनिवारी पर्यावरणप्रेमींनी फलक हाती घेत, जनजागृतीपर रॅली काढली. या रॅलीत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सुमारे २०० नागरिक सहभागी झाले होते. यावेळी या भागातील बांधकाम, अतिक्रमण थांबवावे, हा परिसर सायलेंट झोन म्हणुन घोषित करावा, जैवविविधतेचे मूल्यांकन करावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

हिरानंदानी इस्टेट भागातील कावेसर परिसरात हे तलाव आहे. या तलावामध्ये दुर्मिळ जातीचे पांढरे कमळ आढळून येतात. हे तलाव सुमारे १५० वर्ष जुने असून तलावाभोवती जैवविविधता आढळते. पर्यावरणप्रेमी तसेच हिरानंदानी भागातील नागरिक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी जात असतात. हिरानंदानी इस्टेट परिसरात अनेक बगीचे आहेत. मात्र, निसर्ग संपदेने भरलेले कावेसर तलाव येथील रहिवाशांना नेहमीच आकर्षित करते. या तलावालगत सुशोभिकरणाचा निर्णय ठाणे महापालिकेकडून घेण्यात आला आहे. परंतु, या सुशोभिकरणास हिरानंदानी इस्टेट भागातील नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत, पर्यावरण दिनाच्या पाश्वर्भूमीवर नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्रित येत महापालिकेच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली होती. तसेच रहिवाशांनी व्हाॅट्सॲप तसेच इतर समाजमाध्यमांद्वारे तलाव वाचविण्याची मोहीम हाती घेतली होती. यासंदर्भात ऑनलाईन याचिका देखील केली होती. यामध्ये चार हजारहून अधिक जणांनी स्वाक्षरी करून विरोध दर्शविला. त्यातच शनिवारी पुन्हा एकदा नागरिकांच्या वतीने कावेसर तलाव रक्षणासाठी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. ही रॅली ठाणे पश्चिमेकडील ऋतु इस्टेट येथून कावेसर तलावापर्यंत काढण्यात आली. यावेळी ‘कावेसर वाचवा, ठाणे वाचवा’, ‘विकास नव्हे, विनाश थांबवा’ अशा आशयाचे फलक दर्शवत, घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रमुख चार मागण्यांसाठी ही रॅली काढण्यात आली.

प्रमुख मागण्या काय ?

  • कावेसर तलाव आणि त्याच्या बफर झोनमधील सर्व काँक्रिटीकरण, बांधकाम आणि अतिक्रमण थांबवणे.
  • या जागेला ‘सायलेंट झोन’घोषित करणे. ज्यात ध्वनीक्षेपक, फटाके आणि जास्त आवाजावर बंदी घालणे.
  • या तलावाच्या जैवविविधता आणि तिचे सर्व हंगामांतील फायद्यांचे सर्वसमावेशक मूल्यांकन करणे.
  • कावेसर वेटलँड क्षेत्राचे सीमांकन आणि ग्राउंड-ट्रुथिंग करणे.