ठाणे : दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटाने आणि भाजपच्या पदाधिकारी सामाजिक संस्थांच्या नावाने दिवाळी पहाट साजरी करणार आहेत. मासुंदा तलावाच्या काठाजवळ आणि राम मारूती रोड परिसरात हे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. तसेच काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दिवाळी पहाटनिमित्त शहरात विविध ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा सोमवारी म्हणजेच नरक चतुर्दशी पासून दिवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असून यादिवशी मुंबई, ठाणे तसेच उपनगरात दिवाळी पहाट साजरी केली जाणार आहे. ठाणे शहरात गेले वर्षानुवर्ष दिवाळी पहाट निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही ठाणे शहरात दोन्ही शिवसेना आणि भाजपकडून विविध संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी मासुंदा तलाव आणि राम मारुती रोड परिसरात या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ध्वनीक्षेपकावर तसेच बँडवर गाणी वाजवून येथे उत्सव साजरा केला जात असल्याने ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून हजारो तरुण -तरुणी दिवाळी पहाट निमित्ताने येत असतात. मासुंदा तलाव, चिंतामणी चौक, राम मारुती रोड, गडकरी चौकात मोठ्याप्रमाणात गर्दी होते.

मासुंदा तलाव परिसरातील राजवंत ज्वेलर्स दुकानासमोरील भागात शिवसेना शिंदे गटाकडून एका संस्थेच्या माध्यमातून दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील कलाकार दरवर्षी भेट देतात. तर राम मारूती रोड परिसरात भाजपचे पदाधिकारी संजय वाघुले यांनी विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बाळकूम येथील राष्ट्रीय ब्रास बँड वादनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याच्या माजी महापौर तसेच शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक साजन बेंद्रे आणि डीजे नेश यांचा सहभाग असणार आहे. तर, ठाकरे गट आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गडकरी रंगायतन चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करतात. यंदाही ठाकरे गटाने पोलिसांकडून कायर्क्रमासाठी परवानगी घेतली आहे. परंतू, अद्याप या कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही.

विविध सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमाचे आयोजन

ठाण्यातील शिव समर्थ शाळेच्या मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही गायक महेश काळे यांच्या गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे. तर, ब्रह्मांड कट्टा यांच्यामार्फत दिवाळी पहाट आणि ब्रह्मांड युवा पुरस्कार – २०२५ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठी-हिंदी गाण्यांची मैफल अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच इतर देखील काही संस्थांच्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.