ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा तसेच शहर कार्यकारिणीत बदल केले जाणार नसल्याचे स्पष्ट करत अशा अफवा पसरवून पक्षात गटबाजीचे राजकारण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी ठाणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका लढविणार असल्याचे सांगत आहेत. तसेच या तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीचे काम सुरू केले असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे काँग्रेस शहर पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी मुंबईतील कार्यालयात बोलावली होती. या बैठकीच्या निमित्ताने ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली होती. परंतु बैठकीतील चर्चेनंतर त्यास पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा – धार्मिक स्थळ परिसरात सामूहिक लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपींना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव केसी वेणूगोपाल, पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. तसेच पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील जिल्हा तसेच शहर कार्यकारिणीत बदल केले जाणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा तसेच शहर कार्यकारिणी बदलाच्या अफवा पसरवून पक्षात गटबाजीचे राजकारण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला, अशी माहिती ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र म्हात्रे यांनी दिली.

हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडी मुक्त करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांनी एकदिलाने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊन राज्यात विधानसभा जिंकून सत्ता स्थापन होण्याच्या दृष्ठीने प्रयत्न करावेत,अशा सूचना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. यामुळे ठाणे शहराध्यक्ष पदी विक्रांत चव्हाण हेच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.