बदलापूर: सोमवार ठाणे जिल्ह्यासाठी सर्वात उष्ण दिवस ठरला. जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ते संपूर्ण जिल्ह्यात सरासरी ४१ अंश सेल्सिअस तापमान होते. खासगी हवामान अभ्यासकांनी याची नोंद केली. सकाळपासूनच उन्हाच्या झळा लागत होत्या. तर दुपारनंतर उन्हाच्या झळांमुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाचे चटके लागत होते. रेल्वे प्रवासातही घामाच्या धारा जाणवत होत्या.

राज्यात सर्वत्र उन्हाचा पारा चढत असताना आज मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. अपेक्षेप्रमाणे उत्तरेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे सकाळपासूनच तापमानात वाढ होत होती. दुपारी दोन ते तीनच्या सुमारास जिल्ह्यात सर्वाधिक तापमान होते. जिल्ह्यात मुरबाड मध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी आपल्या स्वयंचलित हवामान स्थानकात तापमानाची नोंद केली. मुरबाड मध्ये ४३.२ अंश सेल्सिअस तर बदलापुरात ४२.५ अंश नोंदवले गेले.

हेही वाचा : ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका

समुद्र किनाऱ्यावरून येणारे वारे उशिरा आल्याने तापमानात उष्णता नोंदवली गेली. बदलापूरनंतर ४२.४, भिवंडीत ४२.३, मुरबाड जवळील धसई येथे ४२.१, कळवा शहरात ४२ तर ठाणे शहरात ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या तापमानामुळे सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. रेल्वे प्रवासातही उन्हाचे चटके जाणवत होते. त्यामुळे प्रवासी घामाघूम होत होते. तर दुपारनंतर अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.