ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी कृषि विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्यातर्फे चार महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित कृषी औजारांचा पुरवठा, विविध सिंचन साहित्य, प्लॅस्टीक तंत्रज्ञानावर आधारित ताडपत्री व मल्चिंग पेपर तसेच पिकांचे संरक्षण करण्यासाठी काटेरी तार कुंपणासाठी अनुदान दिले जाणार आहे. शेतीची उत्पादकता वाढवणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा या योजनांचा उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, तसेच शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करता यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात येतात. शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी होत असलेला त्रास लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने ब्लाॅगस्पाॅट या नावाने एक ॲप्लिकेशन तयार केले. या ॲप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध होत आहे.
त्यासह, शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा, खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक, यासारखी माहिती सहज उपलब्ध होत आहे. त्यापाठोपाठ आता, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सुधारित कृषी औजारांचा पुरवठा, विविध सिंचन साहित्य, प्लॅस्टीक तंत्रज्ञानावर आधारित ताडपत्री व मल्चिंग पेपर तसेच सौर कुंपणासाठी अर्थ सहाय्य योजना अशा नव्या चार योजना सुरु केल्या आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांनी आपले अर्ज जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर २० ऑगस्ट,२०२५ पर्यंत करावेत, असे आवाहन कृषि विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे. या अर्जांची तालुका स्तरावर पडताळणी २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट पर्यंत केली जाणार आहे. त्यानंतर, जिल्हास्तरावर पडताळणी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी असून योजनांचे सर्व तपशील, पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, उत्पादन खर्चात बचत करावी तसेच शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
असे आहे योजनेचे स्वरुप
– विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे योजना
या योजनेत डिझेल इंजिन, पेट्रो डिझेल पंपसंच, पेट्रोल पंपसंच, विद्युत पंपसंच, एचडीपीई / पीव्हीसी पाईप या सिंचन साहित्याचा लाभ दिला जाणार. तर, प्रति लाभार्थी सिंचन साहित्य प्रति नग एकूण किंमतीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ३० हजार रुपये अनुदान दिले जाणार.
– सुधारित कृषी औजारांचा पुरवठा करणे योजना
या योजनेत स्वयंचलित यंत्राने चालणारी सुधारीत औजारे उदा. पॉवर टिलर, पॅडी ट्रान्सप्लांटर, रिपर, ग्रास कटर, पॉवर विडर, पॉवर थ्रेशर, मळणी यंत्र, रोटाव्हेटर, मीनी राईस मिल, चाफ कटर, पेरणी यंत्र व मनुष्यबळाने चालणारी इतर सुधारीत कृषी औजारांचा पुरवठा केला जाणार. या योजनेसाठी प्रति औजार खरेदी किंमतीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये अनुदान दिले जाणार.
– सौर कुंपणासाठी अर्थ सहाय्य योजना
या योजनेसाठी शेतकऱ्यांना पिक संरक्षणाकरीता काटेरी तार कुंपणासाठी अर्थ सहाय्य केले जाणार आहे. यासाठी प्रती लाभार्थी प्रति एकर रक्कम रुपये १५ हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ७५% यांपैकी कमी असेल. प्रति लाभार्थी शेतकरी यांना कमीत कमी २० गुंठे ते जास्तीत जास्त २ एकर क्षेत्र मर्यादेत अनुदान देय राहील. २० गुंठेपेक्षा कमी क्षेत्रास अनुदान देय राहणार नाही.
– कृषि क्षेत्रात प्लॅस्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन योजना
या योजनेसाठी प्लॅस्टिक मल्चिंग शीट यासाठी प्रति लाभार्थी एकूण खर्चाच्या ७५% किंवा १० हजार मर्यादेत अनुदान दिले जाणार. तर, प्लॅस्टिक पॉलिथिन, एचडीईपी ताडपत्रीसाठी प्रति लाभार्थी एकूण किंमतीच्या ७५% किंवा २ हजार मर्यादेत अनुदान दिले जाणार.
योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड
सातबारा उतारा व आठ अ उतारा
रेशन कार्ड
आधार संलग्न बँक पासबुक छायांकित प्रत
अर्जदाराचा फोटो
दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास)
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्र छायांकित प्रत