ठाणे : अनंत चतुर्दशी निमित्ताने शनिवारी (आज) ४४ हजाराहून अधिक सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सुमारे आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. तसेच विसर्जन घाट परिसर, विविध ठिकाणी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना शहरात मिरवणूका संपेपर्यंत बंदी लागू केली आहे. महापालिका प्रशासनाकडूनही विसर्जन घाट परिसरात आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या जवानांना तैनात केले जाणार आहे. घाटावर प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला. शनिवारी अनंत चतुर्दशी निमित्ताने १० दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. ठाणे शहर पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारी नुसार यावर्षी १० दिवसांच्या ७९४ सार्वजनिक आणि ४३ हजार ५३५ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. आता गणरायाला निरोप दिला जाणार असल्याने ठाणे पोलिसांनी ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, भिवंडीसह सर्वच गणेश विसर्जन घाटावर, खाडी किनारी बंदोबस्त ठेवला आहे.

विसर्जन मिरवणूकांमध्ये गर्दी असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन मोबाईल, दागिने किंवा इतर वस्तूंची चोरी होत असते. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष शाखा आणि गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी, कर्मचारी साध्या वेशामध्ये मिरवणूकांच्या ठिकाणी तैनात असतील. वादग्रस्त संदेश, चित्रीकरण समाजमाध्यमावर टाकून काही समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाजकंटकांवर लक्ष ठेऊन त्वरीत कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिसांमार्फत समाज माध्यम कक्ष सतर्क करण्यात आला. धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, चित्रीकरण आढळून आल्यास जवळील पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याचे आवाहनही ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले.

असा असेल पोलिसांचा बंदोबस्त

  • कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांकडून ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये ११ उपायुक्त, २६ साहाय्यक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, ७००० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, मुंबई पोलीस दलातील १० पोलीस निरीक्षक आणि पाच साहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच लोहमार्ग पोलीस दलातील ५० पोलीस कर्मचारी, ८०० गृहरक्षक, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त असणार आहे.
    चौकट
  • ठाणे महापालिका प्रशासनाकडून घाट परिसरात मंडप, सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले आहेत. तसेच कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवानही तैनात असणार आहेत.

ठाणे शहरातून अवजड वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतुक होत असते. गणेशमूर्ती विसर्जन कालावधीत वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी अवजड वाहनांना विसर्जन मिरवणूका संपेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे शनिवारी अवजड वाहनांचा त्रास टळणार आहे.